विद्यापीठातील प्राध्यापिकेने ‘इतिहासा’च्या पुस्तकाला जोडले ‘भूगोला’चे कव्हर, ‘सीएचबी’वाल्याच्या जीवनात भलताच कहर!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर याने एका विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार करून लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच विद्यापीठातील एका सहायक प्राध्यापिकेने ‘इतिहासा’च्या पुस्तकाला ‘भूगोला’चे कव्हर जोडल्यामुळे सीएचबीवर काम करणाऱ्या एका सहायक प्राध्यापकाच्या कौटुंबिक जीवनात झालेल्या भलत्याच कहराचे आहे. त्या सहायक प्राध्यापिकेकडून होत असलेला मानसिक छळ आणि कौटुंबिक जीवनातील हस्तक्षेपाला कंटाळून सीएचबीवरील त्या सहायक प्राध्यापकाने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याची धमकीच कुलगुरू आणि कुलसचिवांकडे केलेल्या तक्रारीत दिली आहे.

घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागातील आहे. या विभागात कार्यरत असलेल्या आणि आजवर ‘बिना’लग्नाच्याच राहिलेल्या महिला सहायक प्राध्यापिकेकडून आपले चारित्र्य हनन केले जात आहे. कौटुंबिक जीवनात हस्तक्षेप केला जात आहे, अशी तक्रार याच विभागात सीएचबीवर कार्यरत असलेले डॉ. रवि खिल्लारे यांनी १९ मे रोजी विभागप्रमुख, कुलगुरू आणि कुलसचिवांकडे केली आहे.

रवि खिल्लारे यांनी इतिहास विषयात पीएच.डी. केली आहे. याच महिला प्राध्यापिका त्यांच्या मार्दर्शक होत्या. रवि खिल्लारे यांचे पीएच.डी.चे संशोधन सुरू असताना प्रोजेक्टवर काम करायचे आहे, असे सांगून या महिला प्राध्यापिका रात्री उशिरापर्यंत त्यांना केबिनमध्ये थांबवून घ्यायच्या. मानव्यविद्या शास्त्राच्या या इमारतीत शुकशुकाट आणि निरव शांतता पसरलेली असतांना हे दोघेच जण ‘प्रोजेक्ट’वर काम करायचे… ‘तथ्यांचे विश्लेषण’, ‘व्यष्टींचे अध्ययन’ इत्यादी इत्यादी बाबींवर रात्री उशिरापर्यंत काम चालायचे.

मजल-दरमजल करत खिल्लारे यांचे पीएच.डीचे संशोधन पूर्ण झाले. त्यांना पीएच.डी. प्रदान झाली. नंतर ते याच विभागात सीएचबीवर सहायक प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांचे लग्नही झाले. सुखाचा संसार सुरू असतानाच या महिला प्राध्यापिकेने मात्र खिल्लारे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीशी संपर्क करून खिल्लारे यांचे कोणत्या विद्यार्थीनीशी कसे अनैतिक संबंध आहेत, हे सांगायला सुरूवात केली. कौटुंबिक जीवनात झालेल्या या ‘बिना’ बुलाए हस्तक्षेपामुळे खिल्लारे यांच्या कौटुंबिक जीवनात वेगळाच ‘संगर’ सुरू झाला.

या महिला प्राध्यापिका एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर एम.ए. इतिहासाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही खिल्लारे यांच्याबाबतीत काहीबाही सांगू लागल्या. एकदा तर त्यांनी ‘मागे’ राहिलेला अभ्यासक्रम ‘पुढे’ नेण्यासाठी घेतलेल्या विशेष वर्गात सकाळपासून सायंकाळपर्यंत शिकवणी घेतली. तो दिवस होता बुद्ध पोर्णिमेचा!  या विशेष वर्गातच त्यांनी ‘रवी तो मेरे साथ केबिन में सोता था…’  अशी विशेष गोष्टच सांगून टाकली. त्यामुळे एम. ए. चे विद्यार्थीही खिल्लारे यांच्याकडे संशयाने पाहू लागले. तरीही या सहायक प्राध्यापिका आपल्या पीएच.डी. च्या मार्गदर्शक आहेत, या ‘उपकारा’ च्या भावनेतून खिल्लारे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

एकीकडे पत्नीकडून व्यक्त केला जाणारा संशय आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या संशयास्पद नजरा यामुळे खिल्लारे प्रचंड मानसिक तणावाखाली आले. आपल्याच मार्गदर्शक राहिलेल्या महिला प्राध्यापिकेकडून होत असलेले चारित्र्य हनन, कौटुंबिक जीवनातील हस्तक्षेप आणि बदनामी यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली वावरू लागले. इतिहासाबरोबरच ‘प्राचीन भारतीय संस्कृती’चे धडे देणाऱ्या या महिला प्राध्यापिकेकडून घडत असलेल्या वेगळ्याच ‘संस्कृती’च्या दर्शनाने त्यांचे जिने हराम करून टाकले.

अखेर हिम्मत करून त्यांनी इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या प्रमुखांकडे तक्रार केली. विभागप्रमुखांनी दोघांनाही बोलावून एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा समज दिली. मात्र हे प्रकरण काही थांबायचे नाव घेत नव्हते. या सहायक प्राध्यापिकेवर थेट कारवाई करण्याचे अधिकार नसल्यामुळे विभागप्रमुखांनी हे प्रकरण कुलगुरूंकडे वर्ग केले.

तरीही त्या सहायक प्राध्यापिकेकडून बदनामी, चारित्र्य हनन आणि कौटुंबिक जीवनातील हस्तक्षेप सुरूच राहिल्यामुळे खिल्लारे यांनी १९ मे रोजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. भगवान साखळे आणि विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली.

या महिला प्राध्यापिकेकडून होत असलेले चारित्र्य हनन, बदनामी आणि कौटुंबिक जीवनातील हस्तक्षेपामुळे आपण डिप्रेशनमध्ये जगत आहोत आणि आत्महत्या करण्याच्या मनोवस्थेपर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत. यापुढेही त्या सहायक प्राध्यापिकेने चारित्र्य हनन आणि बदनामी सुरूच ठेवली तर आपण फेसबुक लाईव्ह आत्महत्या करू, अशी धमकीच खिल्लारे यांनी या तक्रारीत दिली आहे. त्यासाठी त्या महिला प्राध्यापिकेलाच सर्वस्वी जबाबदार धरण्यात यावे, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!