
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अध्यापक प्रवर्गातील ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी २ एप्रिल ते २ मेदरम्यान केंद्र शासनाच्या ’समर्थ पोर्टल’ वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अध्यापक प्रवर्गातील २८९ पदे मंजूर असून आजघडीला फक्त १३० अध्यापक कार्यरत आहेत. अध्यापकांच्या १५९ रिक्त जागांपैकी ७३ पदे भरण्यास राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली. सप्टेंबर २०२३ मध्ये या भरतीसाठी अर्जही मागविण्यात आले होते. त्यावेळी ५ हजार ८१५ अर्ज ऑनलाईन तर सुमारे ४ हजार ६०० हॉर्डकापी जमा झाल्या. तथापि सदर भरती प्रक्रिया जुलै २०२५ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेत रद्द करण्यात आली आहे.
विद्यापीठातील अध्यापक प्रवर्गातील ही रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेरीस मार्चमध्ये पदभरतीस मान्यता देण्यात आली. नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी ७३ पद भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या भरती प्रक्रियेत प्राध्यापकाची ८, सहायोगी प्राध्यापक १२ पदे व सहय्यक प्राध्यापकांची ५३ पदे भरण्यात येणार आहेत.
केंद्रशासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी ’समर्थ पोर्टल’ तयार केले असून या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली असून २ एप्रिल ते २ मे दरम्यान ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रत व सर्व कागदपत्रासह हार्ड कॉपी आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी कळवले आहे.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २ एप्रिल ते २ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
- ऑनलाइन पद्धतीने विहित शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीखः २ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाची हार्डकॉपी विद्यापीठात सादर करण्याची अंतिम तारीखः ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.
कोणत्या विषयासाठी किती जागा?
प्राध्यापक एकूण पदे ८: हिंदी, इंग्रजी, इतिहास, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि लॉ विषयासाठी प्रत्येकी एक जागा.
सहयोगी प्राध्यापक एकूण पदे १२: उर्दू, पाली अँड बुद्धीझम, इतिहास, राज्यशास्त्र, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान, लॉ, बायोटेक्नॉलॉजी. जल आणि भूमी व्यवस्थापन विषयासाठी प्रत्येकी एक जागा.
सहायक प्राध्यापक एकूण पदे ५३
- मराठी, हिंदी, इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच, उर्दू, पाली अँड बुद्धीझम, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य प्रशासन, समाजशास्त्र, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, शारीरिक शिक्षण, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, शिक्षणशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी. जल व भूमी व्यवस्थापन नॅनो टेक्नॉलॉजी विषयासाठी प्रत्येकी १ जागा.
- नाट्यशास्त्र, जनसंवाद व पत्रकारिता, वाणिज्य, केमिकल टेक्नॉलॉजी विषयासाठी प्रत्येकी २ जागा.
- रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, प्राणीशास्त्र विषयासाठी प्रत्येकी ४ जागा.
- भौतिकशास्त्र ५ जागा, वनस्पतीशास्त्र ६ जागा.
कसा करायचा अर्ज?
इच्छूक उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या www.bamu.ac.in या संकेतस्थळावर teaching Posts (शिक्षक भरती) या सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने २ मेपर्यंत भरावा लागेल. या ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट काढून स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह दोन सेटमध्ये कार्यालयीन वेळेत ९ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जमा करावे लागतील.
शुल्क किती?
या भरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने २ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत भरावे लागेल. हे शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. उमेदवारांना अर्जाच्या हार्डकॉपीसोबत शुल्क भरल्याची पावती जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.
वाचा सविस्तर जाहिरात
विद्यापीठातील जागांची सद्यस्थिती अशी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांची ३५ पदे मंजूर असून त्यापैकी तब्बल ३४ पदे रिक्त आहेत. केवळ एकच प्राध्यापक कार्यरत आहे.
- सहयोगी प्राध्यापकांची ८० पदे मंजूर असली तरी ५५ पदे रिक्त असून केवळ २५ सहयोगी प्राध्यापक कार्यरत आहेत.
- सहायक प्राध्यापकांची १७४ पदे मंजूर असून त्यापैकी ६९ पदे रिक्त आहेत.
- बाराव्या पंचवार्षिक योजनेतील १० पदेही मंजूर आहेत. एकूण मंजूर २८९ पदांपैकी केवळ १३१ अध्यापक कार्यरत आहेत तर १५८ पदे रिक्त आहेत. त्यापैकी फक्त ७३ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रिया तरी पूर्ण होणार का?
राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मंजूर पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास ७ ऑगस्ट २०१९ रोजी मंजुरी दिली होती. त्यावेळी विद्यापीठाने अर्जही मागवले होते. परंतु ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.
त्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठातील ७३ पदे भरण्यास मंजुरी दिल्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. पात्र उमेदवारांनी विहित शुल्कासह अर्जही भरले. मात्र या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आल्यामुळे तीही पूर्ण होऊ शकली नाही. या भरती प्रक्रियेत विहित शुल्क भरलेल्या उमेदवारांचे शुल्क विद्यापीठाने हडप करून टाकले. त्यामुळे आता नव्याने करण्यात येत असलेली भरती प्रक्रिया तरी पूर्णत्वास जाईल का? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे.
