औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गणाच्या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. तब्बल १६ तासांपूर्वी ही प्रक्रिया सुरू होऊन अद्याप एकही निकाल हाती आलेला नाही. त्यामुळे १६ तासांपासून उमेदवारांची घालमेल आणि धाकधूक सुरू असून अनेकांनी रात्र जागून काढली आहे.
विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गणातील १० जागांसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले होते. त्याच्या मतमोजणीची प्रक्रिया काल सोमवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली. प्रारंभीच्या टप्प्यात मतपत्रिकांचे विलगीकरण आणि वैध-अवैध मतांची छानणी हाती घेण्यात आली. तीच रेंगाळली आणि रात्री बारा वाजेपर्यंतचा वेळ त्यातच गेला. त्यानंतर अवैध मतांची गणती सुरू करण्यात आली. गणती आणि त्यावरील आक्षेपांचे निरस्सण करण्यात रात्रीचे अडीच- पावणे तीन वाजले आणि रात्री तीन वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करण्यात आली. आता थोड्यावेळापूर्वी म्हणजेच पावणेआठ वाजेच्या सुमारास मतमोजणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शिफ्ट बदलण्यात आली. त्यामुळे ते सेटल व्हायलाही काही वेळ जाईल.
पदवीधर गणातील अनुसूचित जाती प्रवर्गातील निवडणुकीचा निकाल पहिल्यांदा हाती येईल. मात्र त्यासाठीही १० वाजेपर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे सर्वच उमेदवारांची घालमेल आणि धाकधूक सुरू आहे. आपले काय होणार? या विचाराने उमेदवारांचा रक्तदाब आधीच खाली-वर होत असताना संथगतीने सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेने त्यात आणखीच भर घातली आहे.