मंत्री संदीपान भुमरे-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात भरबैठकीत राडा,  थेट अंगावरच धावून गेले!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात आज जोरदार राडा झाला. भरबैठकीत निधी वाटपावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले. हा वाद हमरीतुमरी आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत चिघळला.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी पालकमंत्र्यांकडून आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे आ. राजपूत आणि अंबादास दानवे हे मंत्री भुमरे आणि सत्तार यांच्यावर तुटून पडले.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर आयोजित करण्यात आलेली जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक वादळी ठरणार याचे संकेत आधीच मिळाले होते. निधी वाटपावरून पावसाळी अधिवेशनात झाला तसाच गदारोळ या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही झाला.

या बैठकीत आ. राजपूत यांनी आपल्याला पालकमंत्री संदीपान भुमरे निधीच देत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे भडकलेले मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी आ. राजपूत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनाच सुनावायला सुरुवात केली. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत रौद्ररुप धारण केले. आपल्या खुर्चीवरून उठून ते भुमरे-सत्तार या शिंदे गटाच्या जोडगोळीच्या अंगावर धावून जात तुटून पडले. या नेत्यांमधील वाद थेट हमरीतुमरीपर्यंत पोहोचला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 दरम्यान, या बैठकीनंतर मंत्री भुमरे यांनी ठाकरे गट वगैरे असा काही विषय नाही. इतर तालुक्यांना दिला तितकाच निधी कन्नड तालुक्याला दिल्याचे सांगितले. या बैठकीत अंबादास दानवे यांना आवाज का वाढवावा लागला,असे विचारले असता विरोधी पक्षनेत्याचे ते कामच आहे, असे म्हणत भुमरे यांनी या वादावर फार बोलणे टाळले.

पालकमंत्री स्वत:ची जहागिरी समजत असतील तर…..

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राड्यावर प्रतिक्रिया दिली. जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे स्वत:ची जहागिरी असल्यासारखे पालकमंत्री वागत असतील तर त्यांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे. ती माझी एकट्याची भूमिका नव्हती. सत्ताधारी आमदारांनाही तसेच वाटत होते. मी त्यांची भूमिका मांडली. आ. रमेश बोरनारे, अतुल सावे, हरिभाऊ बागडे या सगळ्याच आमदारांना तसे वाटत होते. मी फक्त ती भूमिका आक्रमकपणे मांडली, असे दानवे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!