भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड, पुन्हा होणार राज्याचे मुख्यमंत्री!


मुंबईः  भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यामुळे उद्या (५ डिसेंबर) आझाद मैदानावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तेच शपथ घेणार हे निश्चित झाले आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आज बैठक झाली. या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजपच्या आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.

फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आज दुपारीच साडेतीन वाजेच्या सुमारास महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली होती. परंतु भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण? याबाबतचा सस्पेन्स गेल्या अनेक दिवसांपासून होता. आता फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे हा सस्पेन्स संपला आहे. महायुतीकडे २३७ आमदारांचे संख्याबळ असून त्यापैकी भाजपकडे १३२ आमदार आहेत. अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबल १३७वर पोहोचले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!