
नवी दिल्लीः दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जनता दरबार सुरू असतानाच एका व्यक्तीने त्यांच्या कानशीलात लगावल्यामुळे मोठा राडा झाला. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज (२० ऑगस्ट) त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. जनता दरबारात मुख्यमंत्री गुप्ता या लोकांची गाऱ्हाणे ऐकून घेत असतानाच एका व्यक्तीने त्यांच्या कानशीलात लगावली. त्यामुळे जनता दरबारात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्री गुप्ता यांच्या कॅम्प ऑफिसमधील निवासस्थानी हा जनता दरबार सुरू असताना ३५ वर्षीय हल्लेखोर तक्रार घेऊन आल्याचे भासवून गर्दीचा फायदा घेत जनता दरबारात शिरला. हातातील कागदपत्रे दाखवत हा ३५ वर्षीय हल्लेखोर रेखा गुप्ता यांच्या जवळ पोहोचला.
मुख्यमंत्री गुप्ता यांनी त्या हल्लेखोराची तक्रार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने आधी खूप आरडाओरड आणि शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने मुख्यमंत्री गुप्ता यांच्या कानशीलात लगावली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्तही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक हल्लेखोराची चौकशी करत आहेत. हल्लेखोर घटनास्थळी कसा घुसला आणि तो मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या इतक्या जवळ कसा पोहोचला? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हल्लेखोराचे नाव राजेश खिमजी सकारिया असल्याचे सांगण्यात येते. पोलिस लाईन्स ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात मुख्यमंत्री गुप्ता जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. हल्लेखोराने कानशीलात मारल्यानंतर रेखा गुप्ता यांचे डोके कुठल्या तरी वस्तूवर धडकले, त्यामुळे त्या जखमी झाल्याचे सांगण्यात येते. दिल्ली पोलिसांनी या हल्ल्याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
