दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मोठा झटकाः अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांचा पराभव; २७ वर्षांनंतर राजधानीत कमळ फुलले!


नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा झटका बसला आहे.  आपचे मुख्य संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभूत करून दिल्लीच्या जनतेने घरी पाठवले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मात्र अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी विजयी झाल्या आहेत.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत ९४.६ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीची मोजणी सध्या सुरू आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपचे प्रवेश सिंग वर्मा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात या विधानसभा मतदारसंघात काट्याची लढत झाली. या लढतीत भाजपचे प्रवेशसिंग वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात नोटाला ३१० मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे केजरीवालांचा पराभव करणारे प्रवेशसिंग वर्मा हे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपचे तरविंद्रसिंह मारवाह यांनी त्यांचा १२०० मतांनी पराभव केला आहे. मनीष सिसोदिया यांनी पराभव मान्य केला असून भाजपचे विजयी उमेदवार तरविंद्रसिंह मारवाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून सातत्याने पिछाडीवर जात होत्या. भाजप उमेदवार रमेश बिधुडी यांनी त्यांना अटीतटीची लढत दिली. मात्र शेवटच्या क्षणी आतिशी यांचा निसटता विजय झाला. काँग्रेसच्या अल्का लांबा तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप उमेदवार ४९ जागांवर आघाडीवर असून आपचे केवळ २१ उमेदवार आघाडीवर आहेत. गेल्या २७ वर्षांपासून भाजपला दिल्लीत सत्ता स्थापन करता आली नव्हती. यावेळी मात्र दिल्लीच्या तख्तावर भाजप बसणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आपने बहुमत मिळवत दिल्लीत सरकार स्थापन केले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपचे जोरदार कमबॅक होताना पहायला मिळत आहे.

…हा अहंकाराचा पराभवः शाह

दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत खोट्या शासनाचा अंत झाला आहे. येथे अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला आहे. येथे मोदींची गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दिल्लीकर विजयी झाले आहेत. या प्रचंड जनादेशासाठी दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. मोदींच्या नेतृत्वातील भाजपने आपले सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प केला ठेवला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!