छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला परभणीतील तरूण आंदोलक आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आज सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आणण्यात आला आहे. सोमनाथच्या मृतदेहाचे न्यायालयाच्या निगराणीत शवविच्छेदन करण्यात येत आहे.
मंगळवारी १० डिसेंबर रोजी परभणी येथील स्टेशन रोडवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.
बंदच्या काळात परभणीत काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून या दगडफेक व जाळपोळ प्रकरणी सुमारे २०० कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यापैकी काही जणांना पोलिस कोठडी तर काही जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
या घटनेप्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेला ३५ वर्षीय तरूण कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असतानाच आज सकाळी सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सोमनाथला तपासून मृत घोषित केले.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झालेला असल्यामुळे त्याच्या मृतदेहाचे न्यायालयाच्या निगराणीत पोस्टमार्टेम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रूग्णालयातच केले जावे आणि फॉरेन्सिक व पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमार्टेमचे चित्रिकरण केले जावे, शी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह परभणीतील सर्वच दलित नेत्यांनी केली होती.
दलित नेत्यांची ही मागणी मान्य करत पोस्टमार्टेमची अशी सुविधा फक्त छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील घाटी रुग्णालयातच असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणण्यात आला आहे. आज रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह घाटी रुग्णालयात पोहोचला. तेथे न्यायालयाच्या निगराणीत पोस्टमार्टेम करण्यात येत आहे.
सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात येत असल्यामुळे शहरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घाटी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह पोहोचताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांची गर्दी होणार हे पाहून घाटी रुग्णालय परिसरात तडगा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.