मुंबईः बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील एका कवितेवरून सोशल मीडियावर सध्या चांगलाच वाद पेटला आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेतील ‘ठुमकत नाचत आला मोर, वन्समोअर वन्समोअर झाला शोर’ या ओळीत वापरलेल्या इंग्रजी शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला असून राज्यभाषा सल्लागार समितीने मराठीच्या पुस्तकातील भाषेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. मात्र ‘एखाद्या लहान गोष्टीचा किती बाऊ करायचा?’ असे म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या कवितेचे अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या इयत्ता पहिलीचे पुस्तक सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या पुस्तकात ‘जंगलात ठरली मैफल’ ही पूर्वी भावेंची कविता प्रकाशित करण्यात आली आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळीत ‘ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर’ असे म्हटले आहे. या कवितेत वन्समोअर हा इंग्रजी शब्द वापरल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेत या कवितेचा दर्जा आणि गुणवत्तेचेच धिंडवडे काढले आहेत. ‘निवड प्रक्रियेतील लोक कडक गांजा मारून बसतात की काय?’ असा संतप्त सवाल सोशल मीडियावर विचार केला जात आहे. हा वाद पेटल्यानंतर राज्यभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बालभारतीचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांना पत्र लिहून राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही, ते तपासून शासनाला अहवाल सादर करावा, अशी मागणी केली आहे.
यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भूमिका मांडली आहे. ‘वन्समोअरला अल्टरनेट मराठी शब्द आहे का? शेवटी यमक जुळवत असताना एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याचा फार मोठा बाऊ केला पाहिजे असे मुळीच नाही. आपण टेबल म्हणतो तो मराठी शब्द आहे का? कप म्हणतो तो पण इंग्रजी शब्द आहे. या शब्दांना पर्यायी मराठी शब्द आलेले नाहीत. त्यामुळे आपण प्रॅक्टिकल राहिले पाहिजे’ असे केसरकर म्हणाले.
‘एखाद्या कवितेत इंग्रजी शब्द आला असेल आणि तो रुढ झालेला असेल तर काय हरकत आहे? आपण कपबशीला कपबशी म्हणतो. टेबलला चौपाई म्हणत नाही, टेबलच म्हणतो. मराठीत एखाद्या गायकाने उत्तम गाणे म्हटले तरीही त्याला वन्समोअरच म्हणतात. ‘पुन्हा एकदा, पुन्हा एकदा’ असे टाळ्या वाजवून कोणी म्हणत नाही,’ असेही केसरकर म्हणाले.
‘काही शब्द रुढ झाले आहेत. मुलांना त्या शब्दांची सवय झाली आहे. तरीही मी याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. समितीला एकदा विचार करायला सांगणार आहे. शक्यतो रुढ शब्द असले तरीही खात्री करा आणि मग वापरा से सांगेन. जी तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यात साहित्यिक आहेतच,’ असेही केसरकर म्हणाले.
‘एखाद्या लहान गोष्टीचा किती बाऊ करायचा? याचे भान प्रत्येकानेच बाळगले पाहिजे. वन्समोअर हा शब्द रुढ आले, त्याला काही पर्याय नाही. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचे धोरण मीच आणले आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात मराठी बोलणे कम्पलसरी केले आहे. त्यावेळी कोणालाही मराठीचा कळवळा आला नाही,’ असेही केसरकर म्हणाले.