मुंबईः विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर आता ‘एक है तो सेफ है’ असा जोरदार प्रचार केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपच्या या प्रचार मोहिमेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याचा अर्थ एक होण्याचा संबंध मोदी, शाह, डोभाल, अदानी, बुच हे पाच लोक सुरक्षित होण्याशी आहे, असे या पोस्टरमधून दाखवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. झारखंडमध्येही प्रचाराने वेग घेतला आहे. वायनाडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून ‘एक है तो सेफ है’ अशी जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अन्य भाजप नेत्यांची प्रचार सभांतील भाषणे आणि प्रसार माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून ‘एक है तो सेफ है’वर भर दिला जात आहे. भाजपच्या या प्रचार मोहिमेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रविवारी सायंकाळी राहुल गांधी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंगवर ‘मन की बात जुबां पर’ अशी टॅग लाइन लिहित राहुल गांधींनी एक पोस्टर शेअर केले आहे. राहुल गांधी यांनी शेअर केलेले हो पोस्टर पाहता पाहता झपाट्याने व्हायरल झाले आहे. पोस्टरवर मोदी आणि अमित शाह यांच्याशिवाय मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, उद्योगपती गौतम अदानी आणि सेबी प्रमुख माधबी पुरी-बुच यांचे फोटो आहेत. भाजपच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याचा अर्थ एक होण्याचा संबंध मोदी, शाह, डोभाल, अदानी, बुच हे पाच लोक सुरक्षित होण्याशी आहे, असे या पोस्टरमधून दाखवण्यात आले आहे.
तत्पूर्वी राहुल गांधी यांनी एक बातमी शेअर करत ‘सर्व सामान्य जनता कधी सेफ होणार मोदी जी? तुम्ही तर फक्त ‘एक’ अदानीला सेफ करण्यात गुंतलेले आहात. हा भयावह फोटो आणि बातमी भारतीय रेल्वेची प्रदीर्घ बेपर्वाई, उपेक्षा आणि जाणूनबुजून करण्यात आलेली कमी नोकर भरतीचा परिपाक आहे,’ असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या राज्यांच्या निवडणूक प्रचारात भाजपकडून ‘एक है तो सेफ है’ अशी प्रचार मोहीम राबवली जात आहे. त्याला राहुल गांधींनी दिलेल्या उत्तरावर आता भाजपकडून कोणते प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.