सरकारी नोकऱ्यांत अर्धा वाटा ते दरमहिन्याला ८ हजार रुपये आर्थिक मदत, काँग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा


नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘नारी न्याय गॅरंटी’ योजनेची घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत काँग्रेसने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना अर्धा वाटा देण्याची तसेच एका गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी १ लाख रुपये म्हणजेच दरमहिन्याला ८ हजार रुपयांहून अधिकची आर्थिक मदत देण्याची हमी दिली आहे.

काँग्रेस आज नारी न्याय गॅरंटीची घोषणा करत आहे. याअंतर्गत काँग्रेस पार्टी महिलांसाठी देशात एक नवा अजेंडा निश्चित करत आहे. नारी न्याय गॅरंटी योजनेअंतंर्गत काँग्रेस पाच घोषणा करत आहे. त्यात महालक्ष्मी गॅरंटी, आधी आबादी-पुरा हक, शक्ती सन्मान, अधिकार मैत्री आणि सावित्रीबाई फुले वसतिगृह योजनेचा समावेश आहे, असे मल्लिकार्जुन खारगे यांनी म्हटले आहे.

यापूर्वी आम्ही भागीदारी न्याय, शेतकरी न्याय आणि युवा न्याय योजना घोषित केल्या आहेत. आमची हमी ही केवळ पोकळ आश्वासने किंवा जुमलेबाजी नसते, हे सांगण्याची गरज नाही. आमची आश्वासने म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहेत. आश्वासने पर्ण करण्याचा आमचा विक्रम आहे. १९२६ पासून आजपर्यंत आम्ही जाहिरनामा तयार करत आहोत आणि त्या जाहिरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करत आहोत. तेव्हा तर आमच्या विरोधकांचा जन्म होत होता, असे खारगे यांनी म्हटले आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या लढाईत काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहनही खारगे यांनी केले आहे.

१.महालक्ष्मी गॅरंटीः महालक्ष्मी गॅरंटी योजनेअंतर्हगत सर्व गरिब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

२.आधी आबादी-पुरा हकः या घोषणेअंतर्गत केंद्र सरकारच्या अखत्यारितील सर्व नवीन नियुक्त्यांमध्ये महिलांना अर्धा वाटा दिला जाईल.

३.शक्तीचा सन्मानः या योजनेअंतर्गत आंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील केंद्र सरकारचा वाटा दुप्पट केला जाईल.

४.अधिकार मैत्रीः या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या अधिकाराबाबत जागरूक करण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका कायदेविषयक सहाय्यकाची नियुक्ती केली जाईल.

५.सावित्रीबाई फुले वसतिगृहः देशातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावे कमीत कमी एक वसतिगृह उभारले जाईल. देशभरात या वसतिगृहांची संख्या दुप्पट वाढवली जाईल.

महालक्ष्मी’ योजना ठरणार गेमचेंजर?

काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेली गरिब महिलांसाठीची देशव्यापी महालक्ष्मी योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. ही योजना अंत्यत आकर्षक आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील एका महिलेला दरमहिन्याला ८ रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम म्हणजेच वर्षाला १ लाख रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. अशा प्रकारची कोणतीही देशव्यापी योजना आजपर्यंत भाजपने लागू केलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरू शकते. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या लाडली बहन योजनेमुळे भाजपने २०२३ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. परंतु भाजप पक्षश्रेष्ठींनी यावेळी चौहान यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले ही बाब वेगळी!

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!