लातूरः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूरमधील ‘देवघर’ या निवासस्थानी त्यांच्या सख्ख्या चुलत भावाने आज रविवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील चाकूरकर (वय ८१) हे लातूरमधील आदर्श कॉलनी भागात राहात होते. त्यांचे घर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घराशेजारीच आहे. ते दररोज सकाळी फिरायला जायचे. फिरून आल्यानंतर ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी येत आणि चहापाणी झाल्यावर तेथेच वर्तमानपत्रे वाचत बसायचे आणि नंतर बाजूलाच असलेल्या आपल्या स्वतःच्या घरी जायचे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा त्यांचा नित्यक्रम होता.
नेहमीप्रमाणे हणमंतराव पाटील आज रविवारीही चाकूरकर यांच्या घरी आले. त्यावेळी शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे घरातच होते. शैलेश चाकूरकर यांनी त्यांना चहा घ्या, मी आवरून येतो असे सांगितले आणि ते आत निघून गेले.
काहीवेळाने घरात गोळी झाडल्याचा आवाज आला. घरातील नोकर आणि शैलेश पाटील चाकूरकर धावत हॉलमध्ये आले. तेव्हा त्यांना हणमंतराव पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.
हणमंतराव पाटील हे वडिलोपार्जित शेती करायचे. त्यांच्याकडे बंदुकीचा परवानाही होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक अगदी कमीवेळा लातूरमधील निवासस्थानी असतात. स्वतःच्या घरी सून, मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी फारसे कुणी नसलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरात आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आत्महत्येपूर्वी परिचितांना पाठवले ‘गुड बाय’चा मेसेजः हणमंतराव पाटील चाकूरकर यांनी रविवारी सकाळी आत्महत्या करण्याआधी स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्या परिचितांना गुड बाय असा टेक्स्ट मेसेज पाठवला होता. त्यांनी व्हॉट्सअपला गुड बाय असे स्टेटस ठेवले होते. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कशामुळे उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.