छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवत असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.
निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींसाठी १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. ही प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पार पाडली जात आहे. परंतु उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाचे घोषणापत्र भरतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी तीन ऐवजी सायंकाळी साडेपाचपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाणनी केली जाईल.
२५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल,आवश्यक असल्यास ५ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.
मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल. सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पुढील ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अंजनडोह, गोलवाडी, पैठण तालुक्यात वडवाळी, सोयगाव तालुक्यात माळेगाव पिंप्री, कन्नड तालुक्यात गुदमा,खुलताबाद तालुक्यात घोडेगाव, रसुलपुरा, तिसगाव, तिसगाव तांडा, वैजापूर तालुक्यात भिंगी, पानगव्हाण, अगरसायगाव, गंगापूर तालुक्यात शहापुर बंजर, वजनापूर, आंबेगाव, गुरुधानोरा.
पुढील ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात टोणगाव, माळीवाडा, आपतगाव, फुलंब्री तालुक्यात जळगाव मेटे, सिल्लोड तालुक्यात आसडी, वरखेडी/भायगाव. रेलगाव, अजिंठा, सोयगाव तालुक्यात कवली, डाभा, गलवाडा, कन्नड तालुक्यात मकरणपूर, देवपूडी, कोळंबी मा., बिबखेडा. खुलताबाद तालुक्यात कनकशिळ, मावसाळा, गंगापूर तालुक्यात वडगाव टोकी, वरझडी, नवाबपूर, कासोडा, इटावा, वैजापूर बाभूळतेल, सावखेड (खं.) पैठण तालुक्यात पारुंडी, आडुळ बु., पाचोड बु., नायगाव येथे पोटनिवडणुका होणार आहेत.