अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला; सीसीटीव्हीचे जाळे, सुरक्षा रक्षकांचा वेढा भेदून घरात घुसला चोर


मुंबईः बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे पश्चिम येथील घरात घुसून एका चोराने चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तो त्याच्या घरात कुटुंबीयांसह झोपलेला असताना ही घटना घडली. सध्या सैफवर लीलावती रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

 वांद्रे पश्चिम येथील सद्गुरू शरण इमारतीत सैफ अली खानचे घर आहे. सुरक्षा रक्षकांचा २४ तास वेढा, सीसीटीव्हीचे जाळे अशी तगडी सुरक्षा भेदून गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सैफ अली खानच्या घरात एक चोर शिरला.

सैफ अली खानची मुले ज्या खोलीत झोपली होती, त्या खोलीत हा चोर उडी मारून शिरला होता. सैफच्या मुलांच्या नॅनीला चोराची चाहूल लागली. त्यामुळे तिने लगेच आरडाओरड सुरू केली. तेव्हा सैफला जाग आली आणि तो त्याच्या खोलीबाहेर आला. त्याक्षणी सैफ आणि चोर आमने-सामने आले. आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारधार चाकूने वार करायला सुरूवात केली. या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला.

सैफच्या घरातील इतर सदस्यही जागे झाले. जखमी सैफला ते सावरण्याचा प्रयत्न करत असताना त्या संधीचा फायदा घेऊन चोर पळून गेला. सैफच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने लीलावती रूग्णालयात दाखल केले. चोराशी झालेल्या झटापटीत सैफच्या मानेला आणि मणक्याला दुखापत झाली आहे. पोलिस या चोराचा शोध घेत आहेत.

सैफवर चोराने केले सहा वार

लीलावती रुग्णालयाचे सीईओ निरज उत्तामनी यांनी सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सैफ अली खानवर रात्री ३.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्याच वांद्रे येथील घरात एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या व्यक्तीने सैफवर सहा वार केले. त्यातील दोन वार अतिशय खोल आहेत. एक वार मणक्याच्या जवळ करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या टीमने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे, असे डॉ. उत्तामनी म्हणाले.

…पण चोर शिरलाच कसा?

ज्या परिसरात सैफ अली खानचे घर आहे, तो वांद्रे पश्चिम परिसर अत्यंत हायप्रोफाईल परिसर मानला जातो. सैफ राहत असलेल्या इमारतीत सहजासहजी प्रवेश मिळत नाही. या इमारतीला नेहमी सुरक्षारक्षक तैनात असतात. या इमारतीत प्रवेश करण्यासाठी एक मोठा गेट आहे. जर कोणाला इमारतीत जायचे असेल तर त्याची कसून चौकशी केली जाते. त्यानंतरच त्या व्यक्तीला आत प्रवेश दिला जातो. शिवाय इमारत आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे आहे. त्यामुळे हा चोर सैफच्या घरात एवढ्या सहजासहजी शिरलाच कसा? हा मोठा प्रश्न आहे.

कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात

आता पोलिसांनी सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे मोबाईलही जप्त केले आहेत. यातील कोणी त्या अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात तर आला नाही ना या दिशेने पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीची सुरक्षा वाढवली आहे.

मुंबई पोलिस म्हणाले…

गुरूवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला. त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!