प्रकाश आंबेडकरांना अटक करा, नारायण राणेची खळबळजनक मागणी; म्हणाले राजकीयदृष्ट्या संपलेले लोक…
पुणेः भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात? त्यांनी घरी बसावे, असेही राणे म्हणाले. राणे यांच्या या मागणीवरून आता वाद होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणतात राज्यात दंगली होऊ शकतात. त्यांनी तारीखही दिली आहे की तीन ते दहा डिसेंबर या कालावधीत असे काही होऊ शकते. खरेच राज्यात अशी परिस्थिती आहे का? पोलिसांना तसा अलर्ट दिला काय? असा प्रश्न पत्रकारांनी राणे यांना विचारला.
पत्रकारांच्या या प्रश्नावर राणे म्हणाले, त्यांच्यावर (प्रकाश आंबेडकर) एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. कोणी माहिती जर लपवत असेल तर तो क्राईम आहे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांग… कारण कुठल्या कालावधीत कुठल्या ठिकाणी दंगल होणार हे माहीत असेल तर त्याचा पुरावा द्यावा लागतो. ते म्हणाले असे चालत नसते. कोण करणार? कुठे दंगल होणार? कुठे करणार? राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात? त्यांनी घरी बसावे, असे राणे म्हणाले.
राणे यांच्या उत्तरानंतर पत्रकारांनी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला. ‘प्रकाश आंबेडकरांना अटक व्हावी, असे तुम्ही म्हणतातय का?’, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर नारायण राणे म्हणाले की, मी कुठे म्हणालो? क्राईम झाला असेल तर (अटक) करायला हवी. प्रकाश आंबेडकर असे किंवा इतर कुणी असो, दंगलीविषयी बोलत असतील तर पोलिसांनी त्याची दखल घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे ती पोलिसांनी घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी, असेही राणे म्हणाले.