पुणेः ‘डीपी मेरी धासू, चित्रा मेरी सासू’ अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघांची खिल्ली उडवणारी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदची आज उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच पाठराखण केली. उर्फी जे काही करतेय त्यात काहीच वावगे नाही, असे म्हणत तोकड्या कपड्यांत वावरते म्हणून उर्फी थोबडवून काढण्याची भाषा करणाऱ्या चित्रा वाघांना त्यांनी तोंडघशी पाडले.
उर्फीही एक स्त्री आहे. ती जे काही करतेय, ते ती स्वतःसाठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगे वाटत नाही, असे अमृता फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उर्फी जावेद घालत असलेल्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी ती मला जिथे कुठे भेटेल, तेव्हा तिला थोबडवून काढीन, अशी भाषा केली होती. तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रारही केली आहे. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद पेटत चालला असतानाच आज अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. अमृता फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे चित्रा वाघ यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.
याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाई करत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीने तिथे प्रोफेशनली कमिटमेंट नाही तिथे संस्कृतीच्या हिशेवाने राहिले तर चांगले आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचे झाले तर.. उर्फीही एक स्त्री आहे. ती जे काही करतेय ते ती स्वतःसाठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगे वाटत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
काहींची व्यावसायिक गरज असते. त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. महिलाच महिलांना आता मागे ओढतात. चुकीचे बोलत आहेत, हे थांबवले पाहिजे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
प्रत्येक विषयावर लोकांचे विचार असतात. तुम्ही जे आहात ते तुम्ही आहात. दबून नका जाऊ, पण भान बाळगा. कुठे कसे वागायचे याचे भान ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचे व्यावसायिक जीवन आणि सार्वजनिक जीवन वेगळे असते, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
नुकतेच प्रसिद्ध झालेले माझे गाणं लोकांना आवडलं. कोणी काहीही बोलले तरी मी काम करत राहिले. मला पंजाबी गाणं आवडलं म्हणून ते गाणं केलं. मी भजन केलं तरी ट्रोल होत. मला ट्रोल होण्याची सवय झाली असून त्याने मला फरक पडत नाही, असेही अमृता म्हणाल्या.