पाटणाः ‘रामचरितमानस’ आणि ‘मनुस्मृती’ समाजात दुफळी निर्माण करणारे आणि समाजात द्वेष निर्माण करणारे ग्रंथ आहेत, असे बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. नालंदा मुक्त विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारंभात बुधवारी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
चंद्रशेखर यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटना चंद्रशेखर यांच्याविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. बिहारच्या विरोधी पक्षाने त्यांना शिक्षणमंत्रिपदावरून हटवण्याची मागणीही केली आहे. तरीही चंद्रशेखर हे आपल्या वक्तव्यावर ठाम असून आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चार करत रामायणावर आधारित ‘रामचरितमानस’ समाजात द्वेष पसरवते, असे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. रामचरितमानसमधील काही भाग काही विशिष्ट जातींच्या विरोधात भेदभावाचा प्रचार करतात, असेही चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्या या वक्तव्यावर भाजप चांगलीच भडकली असून चंद्रशेखर यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्यांनी हिंदू संप्रदायाची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार का?, असे विचारले असता चंद्रशेखर म्हणाले की, हे भगवा (पार्टी) आहे, तथ्यांची माहिती नसल्याकारणाने त्यांनीच माफी मागायला हवी, असे चंद्रशेखर म्हणाले.
मनुस्मृती आणि रामचरितमानस हे हिंदू ग्रंथ दलित, मागासवर्ग आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांच्या विरोधात आहेत, असे चंद्रशेखर यांनी दीक्षांत भाषणात म्हटले होते.
मनुस्मृती, रामचरितमानस आणि भगवेविचारक गुरू गोळवलकरचे बंच ऑफ थॉट्स द्वेष पसरवतात. द्वेषाने नव्हे तर प्रेमाने देश महान बनतो, असेही चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनुस्मृती का जाळण्यात आली? कारण मनुस्मृतीमध्ये एका मोठ्या समाज घटकाच्या विरोधात… ८५ टक्के लोकांच्या विरोधात अनेक शिव्या देण्यात आल्या आहेत. रामचरितमानसचा विरोध का झाला? कोणत्या भागाचा विरोध झाला? ‘अधम जाति में विद्या पाए, भयहु यथा अहि दूध पिलाए. अधमचा अर्थ होतो नीच. नीच जातीच्या लोकांना शिक्षण ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता आणि त्यात असे म्हटले आहे की, ज्याप्रमाणे साप दूध प्याल्यानंतर विषारी बनतो, त्याचप्रमाणे नीच जातीचे लोक शिक्षण ग्रहण करून विषारी बनतात,’ असे चंद्रशेखर म्हणाले.
हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की, हाच भाग उद्धृत करून बाबासाहेबांनी जगाला सांगितले. हे जे ग्रंथ आहेत ते द्वेषाचे बीजारोपण करणारे आहेत. एका युगात मनुस्मृती, दुसऱ्या युगात रामचरितमानस आणि तिसऱ्या युगाता गोळवलकरांचे बंच ऑफ थॉट्सने आमचा देश आणि समाजाची द्वेषात वाटणी केली आहे. द्वेष देशाला कधीच महान बनवू शकणार नाही. देश महान बनेल तर प्रेमानेच महान बनेल, असेही चंद्रशेखर म्हणाले.
भाजप म्हणते चंद्रशेखर देशद्रोहीः बिहारचे माजी कृषी मंत्री व भाजप नेते ए.पी. सिंह यांनी चंद्रशेखर यांच्यावर टीका केली आहे. एक तर ते (शिक्षणमंत्री) पागल आहेत किंवा देशद्रोही आहेत किंवा राष्ट्राच्या विचार प्रक्रियेच्या विरोधात आहेत. त्यांची जागा तुरूंगातच आहे. आम्ही विधानसभेत हा मुद्दा लावून धरू, असे ते म्हणाले. अशा अज्ञानी मंत्र्याला शिक्षण मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना पदावरून हटवले पाहिजे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री अश्विनी चौबे यांनी म्हटले आहे.
काय आहे देशाची सद्यस्थिती?
चंद्रशेखर यांच्यावर टीका करून त्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या आणि हिंदू धर्म तसेच हिंदू धर्मग्रंथांचा अभिमान बाळगणाऱ्यांकडून स्पर्श-अस्पृश्यतेचा भेदभाव मिटवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नच केले जात नाहीत. ही व्यवस्था कायम राखण्याचाच ते कसोशीने प्रयत्न करताना दिसतात. ही व्यवस्था कायम राखण्यातच समाज स्वतःला किती धन्य समजतो, हे सांगणाऱ्या नजीकच्या काळातील या काही ठळक घटनाः
- सप्टेंबर २०१४ मध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री जीतनराम मांझी हे मधुबनी जिल्ह्यातील राजनगर विधानसभा मतदारसंघातील तरही गावातील परमेश्वरी स्थान नावाच्या मंदिरात गेले होते. ते मंदिरातून गेल्यानंतर मंदिर आणि मूर्तींचे शुद्धीकरण करण्यात आले होते.
- मार्च २०१८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुरी येथील जगन्नाथ मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या पत्नीशी सेवादारांना धक्काबुक्कीही केली होती.
- वाराणसीचे कालभैरव, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, आल्मोडा येथील जागेश्वर धाम आणि बागेश्वर येथील बैजनाथ मंदिरात दलितांना प्रवेश करू दिला जात नाही, असा दावा एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने सप्टेंबर २०१८ मध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केला होता.
- सप्टेंबर २०२१ मध्ये कर्नाटकच्या कराटागी गावातील लक्ष्मीदेवी मंदिरात प्रवेश केल्यामुळे एका दलित व्यक्तीला ११ हजार रुपये खर्च करून जेवण देण्यास मजबूर करण्यात आले होते.
- सप्टेंबर २०२१ मध्येच कोप्पल जिल्ह्यातील मियापूर गावात एका दोन वर्षाच्या दलित मुलाने मंदिरात प्रवेश केल्यामुळे दलित कुटुंबाकडून मंदिराच्या शुद्धीकरणासाठी २५ हजार रुपये वसूल करण्यात आले होते.