वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी कारवाई


बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय देशमुख यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोका लावल्यानंतर आता सीआयडी कोठडीची मागणी करणार आहे. दरम्यान वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी देशमुख कुटुंबीयांसह विरोधकांनी लावून धरली होती. दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला आज मंगळवारी केज न्यालयात हजर करण्यात आले होते.
दोन्ही बाजूंनी न्यायालयात युक्तीवाद सुरू असतानाच पोलिसांनी वाल्मिक कराडला मकोका लावला आणि त्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.दरम्यान केज न्यायालयाने आज वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मकोका लावल्यानंतर आता वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीची मागणी केली जाणार आहे.
दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांची संघटित गुन्हेगारीतून हत्या करण्यात आली आहे. जे कोणी या क्रुर हत्याकांडात सहभागी आहेत, त्यांच्याविरूद्ध मकोका आणि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी आमची प्रमुख मागणी होती. या हत्येतील सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला न्याय हवा आहे. तपास चांगला व्हावा, एवढीच आमची मागणी आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!