नवी दिल्लीः बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपावर जाणार आहेत. डिसेंबर महिन्यात सहा दिवस आणि जानेवारी २०२४ मध्ये सात दिवसांचा संप केला जाणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) बँक कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक सूचना जारी केली असून त्यानुसार ४ डिसेंबर २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विविध तारखांना बँक कर्मचारी संप करणार आहेत.
बँकांमधील आऊटसोर्सिंग बंद करा आणि पुरेशा प्रमाणात कायमस्वरुपी नोकर भरती करा या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी विविध तारखांना १३ दिवसांचा संप करणार आहेत. एआयबीईएचे सूचनेनुसार ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत विविध राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यानंतर २ ते ६ जानेवारी दरम्यान विविध राज्यांतील बँक कर्मचारी संपात सहभागी होतील. १९ व २० जानेवारी २०२४ रोजी दोन दिवसांचा बँकांचा अखिल भारतीय संप पुकारला जाणार आहे.
कोणत्या तारखेला, कोणत्या बँकेत संप?
- ४ डिसेंबर- पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक
- ५ डिसेंबर- बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया
- ६ डिसेंबर- कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- ७ डिसेंबर- इंडियन बँक, युको बँक
- ८ डिसेंबर- युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र
- ११ डिसेंबर- खासगी बँकांचा देशव्यापी संप
जानेवारी २०२४ मध्ये सात दिवसांचा संप
डिसेंबर महिन्यात सहा दिवसांचा संप झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जानेवारी २०२४ मध्ये सात दिवसांचा संप पुकारला जाणार आहे. त्यामुळे विविध बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संपाच्या तारखा पुढील प्रमाणे-
- २ जानेवारी- तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार, लक्षद्वीपमधील सर्व बँक कर्मचाऱ्यांचा संप.
- ३ जानेवारी- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमधील सर्व बँक कर्मचाऱ्यांचा संप.
- ४ जानेवारी- राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढमधील सर्व बँक कर्मचारी संपावर.
- ५ जानेवारी- दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील सर्व बँक कर्मचारी संपावर जातील.
- ६ जानेवारी- पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणीपूर, नागालँड, मिझोराम, अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील सर्व बँकांचा संप
- १९ आणि २० जानेवारी- हे दोन दिवस देशभरातील सर्व बँक कर्मचारी देशव्यापी संपावर जातील.