वृत्तपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळणे किंवा वाढणे आरोग्यासाठी हानिकारक, तत्काळ वापर थांबवाः एफएसएसएआयचा सूचना


नवी दिल्लीः खाद्यपदार्थांची पॅकिंग, साठवणूक किंवा खाद्यपदार्थ वाढण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर तत्काळ बंद करण्याची सूचना भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) केली आहे.

वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत अशी काही रसायने असतात की त्यामुळे विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, एफएसएसएआयने म्हटले आहे.

खाद्यपदार्थांची पॅकिंग, साठवणूक किंवा खाद्यपदार्थ वाढण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर तातडीने बंद करावा, असा आग्रह देशभरातील ग्राहक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना करण्यात आला आहे, असे एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जी, कमल वर्धन राव यांनी सांगितले.

खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केल्यामुळे निर्माण होणारी आरोग्याशी संबंधित जोखमीवर एफएसएसएआयने प्रकाश टाकला आहे.

वृत्तपत्रात अन्न गुंडाळणे ही एक अस्वास्थकारक प्रथा आहे आणि अन्न जरी स्वच्छ शिजवलेले असले तरीही असे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.

वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत विविध ‘बायोऍक्टव्ह घटक’ असतात. हे घटक आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. शाईमध्ये आरोग्यावर विपरित परिणाम करणारे विविध जैव सक्रीय पदार्थ असतात. या जैव सक्रीय पदार्थांमुळे खाद्यपदार्थ दूषित होतात आणि ते खाल्ल्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उदभवू शकतात, असे राव यांनी म्हटले आहे.

वृत्तपत्र छपाईच्या शाईमध्ये शिसे आणि अवजड धातूसारखी रसायने असतात. वृत्तपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळल्यामुळे किंवा वाढल्यामुळे मानवी शरीरात प्रवेश करतात.

याशिवाय वृत्तपत्रांच्या वितरणाच्या प्रक्रियेत विविध पर्यावरणीय परिस्थितीतून जावे लागते. त्यामुळे वृत्तपत्रे जिवाणू व विषाणू अथवा अन्य रोगांणु वृत्तपत्रावर पसरण्याची शक्यता असते. हे जिवाणू व विषाणू खाद्यपदार्थात जाऊ शकतात आणि त्यामुळे खाद्यजनित आजारांना निमंत्रण मिळू शकते, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.

अशा सामुग्रीत पॅकिंग केलेले किंवा वाढलेले अन्न खाल्ल्यामुळे कर्करोगाशी संबंधित आरोग्यविषयक समस्या उदभवण्याचा धोका असतो.

खाद्य सुरक्षा आणि मानक (पॅकेजिंग) अधिनियम २०१८ मधील तरतुदीनुसार खाद्यपदार्थांची साठवणूक, पॅकेजिंग अथवा गुंडाळण्यासाठी वृत्तपत्रे किंवा त्यासारख्या सामग्रीचा वापर करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला असल्याचेही एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे.

ग्राहक किंवा विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ झाकण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर टाळला पाहिजे. समोसा किंवा पकोडा यासारख्या तळलेल्या खाद्यपदार्थातील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर करू नये, असे या अधिनियमात म्हटले आहे.

कुणीही भोजन अथवा खाद्यपदार्थांची पॅकिंग करण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर करणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी एफएसएसएआय आ राज्य खाद्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे.

वृत्तपत्रांचा वापर टाळून आणि अन्य सुरक्षित पर्यायांना प्रोत्साहन देऊन देशभरात पुरवठा केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एफएसएसएआय वचनबद्ध असल्याचे राव यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!