छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर सहा जणांनी ब्लॅकमेल करून वारंवार सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दोन आरोपी फरार आहेत. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
या धक्कादायक घटनेचा तपशील असा की, शहराच्या सातारा परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीचे शिक्षण सुरू आहे. सध्या ती ९ व्या वर्गात शिकत आहे. ही चौदा वर्षीय मुलगी २०२२ मध्ये वाईट संगत असलेल्या एका मुलाच्या संपर्कात आली. मैत्री वाढल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले.
जवळीक वाढल्यानंतर तिच्या त्या मित्राने भेटण्याचा हट्ट धरला. ही शाळकरी मुलगी भेटालया आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ शूट केला. त्या व्हिडीओचा गैरफायदा घेऊन मुख्य आरोपीच्या ओळखीच्या मित्रांनी तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तिला रात्री-बेरात्री घराबाहेर बोलावून वेगवेगळ्या ठिकाणी हे सहा जण तिच्यावर बलात्कार करू लागले.
ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२३ या काळात वेगवेगळ्या ठिकाणी कधी दोघे तर कधी तिघे जण एकत्र येऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करू लागले. सतत वाढलेल्या अत्याचाराला कंटाळून मुलीने घरी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबीयांना याबाबत धक्का बसा आणि त्यांनी तिची साथ न दिल्यामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
वडिल घराबाहेर गेल्यावर पीडित मुलीने घरातील १० हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐवज घेऊन घर सोडले होते. ती पळून जाण्याच्या तयारीत असतानाच लोहमार्ग पोलिस व दामिनी पथकाने रेल्वे स्टेशनवर तिला पकडले.
पोलिसांनी तिची चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेव्हा बालकल्याण समितीने तिला बाल गृहात ठेवण्याचे आदेश दिले. या कालावधीत तिचा रितसर जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर बालकल्याण समितीने या प्रकऱणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत असलेल्या सहा आरोपींपैकी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी फरार आहेत. किशोर चव्हाण, अक्षय चव्हाण, असीम पठाण, राम गायकवाड अशी सहापैकी चार आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.