दलालांना पोसणे महागात पडले, सह दुय्यम निबंधक गायब असल्याने खासगी व्यक्तीनेच घेतला सर्वासमक्ष खुर्चीचा ताबा; दस्तही हाताळले!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): दस्त नोंदणीचे कामकाज हातळणाऱ्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांशिवाय पानही हालत नाही, असा सार्वत्रिक अनुभव असतानाच या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ज्या दलालांना पोसले तेच आज त्यांच्यावर भारी पडल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयात पहायला मिळाले. कार्यरत सह दुय्यम निबंधकाने रजेवर जाताना पदभार सोपवलेल्या समकक्ष अधिकारी वेळेवर कार्यालयात हजर न झाल्यामुळे ताटकळत बसलेल्या नागरिकांनी एका खासगी व्यक्तीची सह दुय्यम निबंधक म्हणून बहुमताने निवड केली. निवडीनंतर हा व्यक्ती सह दुय्यम निबंधकाच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि त्यांनी दस्तही हाताळल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या सह दुय्यम निबंधक क्रमांक-२ कार्यालयात घडला.

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी तथा मुद्रांक विभाग नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. मंगळवारी सकाळी मात्र या कार्यालयात अजबच प्रकार घडला. दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ या कार्यालयात नेहमी प्रमाणे ऑपरेटर आणि इतर कर्मचारी आपल्या ठिकाणी येऊन बसले. सह दुय्यम निबंधक आर.पी. राठोड  हे सोमवारी आजारी रजेवर असल्याने त्यांचा पदभार दीपक जाधव यांच्याकडे दिला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी हा पदभार सोपवण्यात आलेले दीपक जाधव हे वेळेवर कार्यालयात दाखल झाले नाही. त्यामुळे कर्मचारी दस्त नोंदणीसाठी सह दुय्यम निबंधकांची वाट पाहत होते. परंतु सकाळी साडेदहा वाजेपर्यंतही प्रभारी सह दुय्यम निबंधक न आल्याने कामकाज सुरू झाले नाही.

दस्त नोंदणीसाठी कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु ११ वाजले तरी सह दुय्यम निबंधकच न आल्याच पाहून अबु आला हाश्मी  या खासगी व्यक्तीने चक्क सह दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाचा ताबा घेतला. अधिकारी वेळेवर आले नसल्याने जनतेने आपल्याला सह दुय्यम निबंधक म्हणून नियुक्ती केले असून मी आता कारभार करणार असे म्हणत सह दुय्यम निबंधकांच्या खुर्चीवरही जाऊन बसला.

१५ ते २० मिनिटे ही व्यक्ती सह दुय्यम निबंधकाच्या खुर्चीवर बसली. ‘कोण आहे रे कॉम्प्युटर ऑपरेटर, चला दस्त घेऊन या’ असे म्हणत ‘सर्वांचे दस्त नोंदविले जातील. कोणतेही दस्त नाकारले जाणार नाही, असे व्यक्ती सह दुय्यम निबंधकाच्या खुर्चीवर बसून बोलत होता आणि सरकारी दस्तांची हाताळणी करत होता. १५ ते २० मिनिटे सह दुय्यम निबंधकाच्या खुर्चीवर बसून ही व्यक्ती नंतर खुर्चीवरून उठून निघून गेली खरी, परंतु त्यानेच या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून समाज माध्यमावर व्हायरल केला. 

हा व्हीडिओ क्षणात सर्व समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सह दुय्यम निबंधक क्रमांक-१ रविंद्र तोंडे यांच्याकडे तत्काळ सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ चा पदभार यांच्याकडे सोपवला. त्यांनी कार्यालयाचे कामकाज सुरू केले. परंतु आधार व्हेरिफिकेशन साईट सुरू नसल्याने दस्त नोंदवण्याचे काम पुढे सरकले नाही. घडलेल्या घटनेबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. नोंदणी विभागात दिवसेंदिवस एजन्ट आणि खाजगी व्यक्तींची दादागिरी वाढत असताना याबाबत कडक भूमिका घ्यावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

घटनेची माहिती सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिला असता त्यांनी गांगुर्डे यांना चांगलेच खडसावले. दरम्यान घटनेचा व्हीडिओ जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला. खाजगी व्यक्तीने शासकीय कार्यालयाचा ताबा घेतल्याच्या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेतली. तसेच वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहिलेले राठोड यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आणि सह दुय्यम निबंधक कार्यालयाचा ताबा घेऊन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेल्या हाश्मी याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले. पहा व्हिडीओ-

दस्त नोंदणी कार्यालये ओस

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गांगुर्डे यांनी वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहिलेल्या राजेश राठोड यांचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याचे आदेश लिपिक भगत यांना दिले. सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे, दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे, रविंद्र तोंडे, दीपक जाधव, अक्षय सुगंधी असे सर्वजण गुन्हा दाखल करण्यासाठी सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल झाले. नोंदणी विभागात एकही अधिकारी कर्मचारी नसल्याने दोन्ही कार्यालये बंद करण्यात आली. रविंद्र तोंडे यांच्या तक्रारीवरून आबुलाला हाश्मी याच्यासह इतर दहा ते पंधरा आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १८९(२), २०४, २२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांगुर्डेविरुद्ध घोषणाबाजी

सह दुय्यम निबंधक क्रमांक २ च्या खुर्चीचा ताबा घेणारा अबु लाला हाश्मी याने सकाळी कार्यालयात केवळ गोंधळच घातला नाही तर अधिकारी गुन्हा दाखल करण्यास पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून येताच सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास १० ते १५ जणांना गोळा केले. नोंदणी विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जेडीआर गांगुर्डे मुर्द्दाबाद अशा घोषणाही दिल्या, असे सिटी चौक पोलिसात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

दस्त नोंदणीत संघटित गुन्हेगारी?

सह दुय्यम निबंधक क्रमांक २ कार्यालयात मंगळवारी सकाळी १०.४५ वाजता हा प्रकार घडल्यानंतर ११ वाजेपासून मुद्रांक नोंदणीची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व कार्यालये बंद करण्यात आली. बीड बायपासवरील दोन्ही कार्यालये बंद करून सगळे कर्मचारी पोलिसांत तक्रार करण्यासाठी जमा झाले. कार्यालय बंद असल्याने नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. सह दुय्यम निबंधक कार्यालायत संघटित गुन्हेगारी सुरू आहे, असा आरोप खुर्चीचा ताबा घेणाऱ्या अबु लाला हाश्मी याने केला आहे.

दलालांना पोसतात अधिकारीच!

दस्त नोंदणी विभागात दररोज होणारे बेकायदेशीर दस्त नोंदणीचे इनपुट कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच घेऊन काही दलाल अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात. कार्यालयातून ठराविक रक्कम घेऊन जातात, अशी चर्चा आहे. कार्यालातील बेकायदेशीर कामांची माहिती कर्मचारीच दलाल व ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना देतात. त्या माहितीच्या आधारे उपोषण, आंदोलने, माहिती अधिकारातील अर्ज, कोर्टकचेरीची प्रकरणे जन्माला येतात. दलालांना पोसणारी मोठी साखळी विभागातच आहे. तसेच खाजगी व्यक्तीही या ठिकाणी बेकायदेशीरित्या काम करतात. त्यामुळे येथील कारभाराची चौकशीची मागणी होत याहे. दरम्यान मंगळवारी दिवसभरात २५० दस्त नोंदणी झाले नाहीत. त्यामुळे मंगळवारी दिवसभरात राज्य सरकारचा सुमारे एक ते दीड कोटींचा महसूल बुडाल्याचे सांगण्यात येते. त्याची जबाबदारी निश्चित करून जिल्हाधिकारी स्वामी कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!