अंबड पोलिसांचे डोके ‘हत्ती’अंबारीतः फिर्यादी व आरोपी अनुसूचित जातीचेच, तरीही समाज कल्याण उपायुक्तांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): फिर्यादी आणि आरोपी दोघेही अनुसूचित जातीचेच असतानाही जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांनी परभणी येथील बहुजन हिताय भोजन उत्पादन व पुरवठा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग नागोराव हत्तीअंबीरे यांच्या फिर्यादीवरून औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठीच हत्तीअंबीरे यांच्याकडून ऍट्रॉसिटीचा दुरूपयोग तर केला जात नाही ना? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे. श्रीरंग हत्तीअंबीरे हे परभणीतील वजनदार राजकीय कुटुंबांशी संबंधित असून ते संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे यांचे सख्खे भाऊ आहेत.

परभणीच्या रमाई आंबेडकरनगरमध्ये  नोंदणीकृत कार्यालय असलेल्या श्रीरंग हत्तीअंबीरे यांच्या बहुजन हिताय भोजन उत्पादन व पुरवठा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेला जालन्याच्या सहायक समाज कल्याण आयुक्तांनी अंबड येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहास भोजन पुरवठा करण्याच कंत्राट दिले आहे.

अंबड येथील या मगासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुदबाह्य बिस्किटांचा पुरवठा केल्यामुळे आणि ही बिस्किटे आरोग्यास असुरक्षित असल्यामुळे श्रीरंग हत्तीअंबीरे यांच्यासह त्यांच्या संस्थेवर अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून ५ फेब्रुवारी २०२३ रोजी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण सी-समरी झाले होते.

आपल्या विरोधात दाखल केलेला गुन्हा खोटा असून आपण केवळ ‘महार’ जातीचे असल्यामुळेच औरंगाबाद विभगाच्या प्रादेशिक समाज कल्याण आयुक्त जयश्री सोनकवडे, अंबड येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल किशोरी अलोने आणि जालन्याचे सहायक समाज कल्याण आयुक्त अमित घवले यांनी हेतुतः जातीयद्वेषातून आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. आपण महार जातीचे असल्यामुळेच या तिघांनी हे कृत केले आणि आपल्याला अपमानित केले, त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे आपली व आपल्या संस्थेची बदनामी झाली, कंत्राट रद्द झाले, अशी फिर्याद श्रीरंग हत्तीअंबीरे यांनी अंबड पोलिसांत दिली.

अंबड पोलिसांनी श्रीरंग हत्तीअंबीरे यांच्या फिर्यादीवरून २२ जुलै २०२३ रोजी अंबड येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल किशोरी अलोने, औरंगाबादच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे आणि जालन्याचे सहायक समाज कल्याण आयुक्त अमित घवले या तिघांविरोधात भादंविच्या कलम १७७, ३४, ४२०, ४९९, ५०० आणि अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या कलम ३(१)(पाच), ३(१)(दहा), २(१)(टी), ३(१)(क्यू) आणि ३(१)(झेडसी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरंग हत्तीअंबीरे यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार ते जातीने ‘महार’ आहेत आणि त्यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यात (एफआयआर क्र. ०५७८) क्रमांक दोनच्या आरोपी औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे या जातीने चांभार ढोर आहेत. ‘महार’ ही जात जशी अनुसूचित जातीमध्ये (एससी) समाविष्ट आहे, तशीच चांभार ढोर ही जातही अनुसूचित जातीतच समाविष्ट आहे.

असे असतानाही अंबड पोलिसांनी एका अनुसूचित जातीच्या फिर्याददाराच्या फिर्यादीवरून एका अनुसूचित जातीच्याच व्यक्तीविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कसा काय केला? हा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव आणला?  असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

परभणी येथील हत्तीअंबीरे हे कुटुंब जसे राजकारणात सक्रीय आहे, तसेच ते विविध उद्योगधंद्यातही सक्रीय आहे. बहुजन हिताय भोजप उत्पादन पुरवठा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, संबोधी अकादमी अशा विविध उद्योगधंद्याच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाबरोबरच व्यवसायातही ‘जम’ बसवला आहे. संबोधी अकादमी ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देते. त्यासाठी बार्टीकडून संबोधी अकादमीला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो.

परंतु राजकारण आणि समाजकारणात प्रतिष्ठा मिळवलेल्या हत्तीअंबीरे कुटुंबाकडूनच ऍट्रॉसिटी कायद्याच्या अशा प्रकारे दुरूपयोग केला गेल्याचे उघडकीस आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून आपल्या ‘उद्योगा’चे धंदे कुठल्याही आडकाठीशिवाय पुढे रेटण्याचा तर त्यांचा हेतू नाही ना? अशी शंका आता घेतली जाऊ लागली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!