बीडः बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच माजी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यात बाचाबाची आणि जोरदार खडाजंगी झाली. बीडच्या अधिकाऱ्यांवर दहशत असल्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आणि वादंगाला सुरूवात झाली. मात्र एवढ्या तेवढ्या मुद्यावर बोलचाल होतच असते असे सांगत खा. सोनवणे यांनी बैठकीनंतर या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दहशत आहे, असे मंत्री धनंजय मुंडे भरबैठकीतच म्हणाले. त्यावर कोणाची दहशत आहे हे उघड करा, असे खा. बजरंग सोनवणे म्हणाले. बीड जिल्ह्याला बदनाम केले जात असल्याचा मुद्दाही धनंजय मुंडे यांनी मांडला. त्यावरही आ. सुरेश धस आणि खा. सोनवणे यांनी मुंडेंना प्रत्युत्तर दिले. बीड जिल्ह्याची बदनामी कोण करत आहे? असा सवाल आ. धस आणि खा. सोनवणे यांनी केला. जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आम्ही जनतेसमोर मांडत आहोत, असेही खा. सोनवणे आणि आ. धस म्हणाले. या मुद्द्यावरून मुंडे आणि धस-सोनवणे यांच्यात काही काळ बाचाबाची झाल्याची चर्चा आहे.
बैठकीनंतर मात्र खा. सोनवणे आणि आ. धस यांनी बाचाबाची किंवा भांडण झाले नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बीडमध्ये अधिकाऱ्यांवर दहशत असल्याचा मुद्दा माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. दहशतीच्या मुद्यावरून थोडी बाचाबाची झाली. एवढ्या तेवढ्या मुद्यावरून बोलचाल होतच असते, असेही खा. सोनवणे म्हणाले.
धनंजय मुंडे म्हणाले का भांडण झाले?
आ. सुरेश धस यांनीही बाचाबाची हा किरकोळ विषय आहे. तेवढे विषय होतच असतात. कुठलाही गट-तट नव्हता. एकमेकांना बोलल्याने लगेच वादावादी होते का? भांडणे लावता का तुम्ही? हे भांडण गुद्द्याचे नाही तर मुद्याचे भांडण आहे. धनंजय मुंडे म्हणाले का भांडण झाले? नाही ना? मग आम्हीही भांडण झाले असे म्हणणार नाही, असे आ. धस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
पेनड्राइव्ह दिला अन् ५०० लोक कोमात गेले
अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम कार्यालयांतर्गत ७३ कोटी ३६ लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बिलांच्या आधारे पैसे उचलण्यात आले. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सविस्तर माहिती असलेला पेनड्राइव्ह मी अजितदादांचे स्वीय सहाय्यक डिसले यांना बुधवारी रात्रीच दिला. पेनड्राइव्ह दिल्यापासून जिल्ह्यातील ५०० लोक कोमात गेले, असा दावाही आ. धस यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आ. धस यांनी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. त्याबाबत सविस्तर लेखी तक्रार द्या, अशी सूचना अजित पवार यांनी केली.
अजितदादांच्या शेजारीच पकंजा मुंडे
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारीच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बसल्या होत्या. यावरूनही राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली. त्याबाबत पंकजा मुंडेंना पत्रकारांनी विचारले असता धनंजय मुंडेंना यायला उशीर झाला. अजित पवारांनी मला तिथे बसण्याची विनंती केली. त्या खुर्चीसमोर मंत्री लिहिलेले होते. मी मंत्री असल्यामुळे तिथे बसले. शासकीय बैठकींचा प्रोटोकॉल असतो. मी त्याचेच पालन केले, असे बैठकीनंतर पंकजा मुंडे म्हणाल्या.