बंडखोरीनंतर अजित पवारांनी सांगितला घड्याळ चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा, शरद पवारांना मोठा धक्का!


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही या पुढच्या सगळ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हावरच लढणार आहोत, असे सांगत घड्याळ चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला आहे.

 रविवारची सकाळ महाराष्ट्रात राजकीय भूकंपसदृश्य परिस्थिती घेऊनच उगवली. अजित पवार यांनी आज सकाळीच देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर त्यांनी थेट राजभवन गाठून राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश आमदारांना माझा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. या पुढच्या सगळ्या निवडणुका आण्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरच लढवणार आहोत, असे सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भारतीय जनता पक्षासोबतही जाऊ शकतो, असेही अजित पवार म्हणाले.

आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आमच्याबरोबर जवळपास बहुसंख्य आमदार, सर्व पक्ष आहे. मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. मंत्रिमंडळात पुढे पुन्हा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

 विकासाचा एकमेव मुद्दा पाहून आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही कुणाच्याही टिकाटिप्पणीला उत्तर देणार नाही. गेली अनेक दिवस चर्चा सुरू होती. अनेक जण एकत्र बसायचो. देश पातळीवरची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेतला. विकासाला महत्व दिले पाहिजे, असे माझे मत आहे. देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेगाने, मजबुतीने पुढे नेत आहे. म्हणून त्यांना साथ द्यायचा निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले.

सगळ्यांनाच शरद पवारांचे आशीर्वाद?

पंजाब, पश्चिम बंगाल आणि अनेक राज्यांत विरोधी पक्ष नुसते बैठका घेत आहेत. पण आऊटपूट काही निघत नाही. शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि आज सरकारमध्ये सामील झालो, असे अजित पवार म्हणाले. शरद पवारांची भूमिका काय? असे पत्रकारांनी विचारले असता, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहे, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!