अमरावतीच्या जिजाऊ बँकेकडून कोट्यवधींचे नियमबाह्य कर्जवाटप, दोषींवर होणार कारवाई


नागपूर: अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी सहकार आयुक्तांनी  अमरावतीच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

 आमदार उमा खापरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

 अमरावतीच्या जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बॅकेबाबतच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहकार आयुक्तांनी १० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये तपासणीसाठी अमरावतीच्या प्रादेशिक उपसंचालकांची (साखर) यांची नियुक्ती केली असून त्यांनी १८ ऑगस्ट २०२३ रोजी तपासणी अहवाल  सादर केला आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

या अहवालामध्ये कर्ज मंजूर प्रकरणांमध्ये पुरेसे तारण न घेणे, कर्जदाराची क्षमता न पाहता कर्ज देणे, संपूर्ण कर्ज रक्कम उचल देणे, कमी व्याजदराने कर्ज मंजूर करणे, शासन मान्यता न घेता एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविणे इत्यादीमध्ये अनियमितता आढळून आली आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

या अनियमितता आढळून आल्यामुळे  या बँकेची चौकशी करण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशान्वये सहकार आयुक्तांनी अमरावतीच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषीं असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे वळसे पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!