आरोग्य विभागातील मेगा भरतीसाठी प्राप्त झाले तब्बल २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज


मुंबई:  सार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त असलेल्या विविध संवर्गातील १० हजार ९४९ जागांसाठी तब्बल २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका रिक्त जागेसाठी जवळपास २४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या नोकरभरतीच्या शुल्कापोटी सुमारे २५ कोटी रुपये गोळा झाले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व ‘ड’ मधील भरतीसाठी २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. गट ‘क’मधील एकूण ५५ संवर्गातील ६ हजार ९४९ रिक्त पदे असून ‘ड’ गटातील ४ हजार १० रिक्त पदे आहेत. अशाप्रकारे एकूण १० हजार ९४९ पदांसाठी आरोग्य विभगाने जाहिरात प्रसिद्धीस दिली.

 या जाहिरातीस प्रतिसाद मिळत तब्बल २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये गट ‘क’ मधील रिक्त पदांसाठी १ लाख ४२ हजार २०६ आणि ‘ड’ गटातील रिक्त पदांकरीता ११ हजार ६४९ अर्जांचा समावेश आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे ८ परिमंडळ क्षेत्रात विभागलेली आहेत. गट ‘क’चे नियुक्ती प्राधिकारी उपसंचालक, आरोग्य सेवा आहेत.

आरोग्य विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी विभागाने २८ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर होती. भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आता संपला असून लवकरच पुढील कार्यवाही होणार आहे.

भरतीमुळे आरोग्य विभागातील विविध रुग्णालयांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामुळे मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होणार आहे. नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांवर मनुष्यबळ नियुक्त करण्याचे काम लवकरात लवकर केले जाणार आहे. या भरतीमुळे आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करून भरती करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत प्रयत्नरत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झाली. याबाबत त्यांनी विविध बैठकाही घेतल्या. ही भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत घेतलेल्या बैठकीत निर्देशही दिले आहेत. तसेच याबाबत विभागाने कंपनी प्रतिनिधीसोबत नियतकालिक आढावा बैठक घेऊन भरती प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विभागातील रिक्त पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया गतीने पुढे सरकत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!