उन्हाचा तडाखा पाहता मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नका, घरबसल्या देऊ निकालाची माहितीः जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी  मंगळवारी (४ जून) रोजी होणार आहे. निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच असते.  त्यासाठी लोक मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करतात. मात्र यंदा उन्हाचा तडाखा व तापमान अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करु नये. त्यांना निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली आहे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

मतमोजणी होत असतांना नागरिकांना प्रत्येक फेरीनिहाय निकाल ऐकण्याची उत्सूकता असते. त्यासाठी नागरिक मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करतात. मात्र यंदा उन्हाळा व वाढते तापमान पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये. निकालाची माहिती देण्यासाठी विविध वृत्तवाहिन्या, जिल्हा प्रशासनाचे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स, स्थानिक केबल वाहिन्या यांच्याद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या निकालाची माहिती मिळेल. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्याची परिस्थिती पाहता मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये,असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.

प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक

मतमोजणी केंद्रावर मतमोजणी कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी एजंट यापैकी प्रत्येकाला प्रवेशासाठी निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे आपली गैरसोय टाळण्यासाठी प्रवेश ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

ज्या माध्यम प्रतिनिधींना निवडणूक आयोगामार्फत प्राधिकार पत्रे देण्यात आले आहे त्यांनी प्राधिकार पत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर मोबाइल फोन तसेच अन्य कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आत नेण्यास मनाई आहे. माध्यम प्रतिनिधींना केवळ मीडिया सेंटर मध्येच मोबाइल नेता येणार आहे, याची नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे.

मतमोजणीसाठी निरीक्षक नियुक्त

औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. त्यांची नावे याप्रमाणे-

कांतीलाल दंडे(भाप्रसे)- कन्नड, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद(पश्चिम).
निवास- गोदावरी कक्ष, सुभेदारी विश्रामगृह. संपर्क क्रमांक-७०२८७५२५४८.

किशोरीलाल शर्मा- औरंगाबाद(पूर्व), गंगापूर, वैजापूर.
निवास- मांजरा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह, संपर्क क्रमांक- ७०२८७५२५३७.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *