नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज देशातील ८ राज्यांतील ५७ जागांवर मतदान होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ९०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मतदान संपल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेपासून एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर व्हायला सुरूवात होणार आहे. त्यामुळे निकालाआधी सगळ्यांच्याच नजरा एक्झिट पोलकडे लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज पंजाबमधील सर्व १३, हिमाचल प्रदेशातील ४, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६ आणि झारखंड व चंदीगडमधील प्रत्येकी ३ जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उकाडा किंवा पावसाचा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
आज सातव्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेपासून एक्झिट पोल जाहीर केले जातील. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी विरुद्ध भाजपच्या नेतृत्वातील एनडीए अशी थेट लढत झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत. आता एक्झिट पोलचे अंदाज नेमके काय असतील? याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.
आजचे मतदान संपल्यानंतर आजपासून तीन दिवसांनी म्हणजे ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. आज सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेनंतरच एक्झिट पोल जाहीर करावेत, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असल्यामुळे साडेसहानंतरच एक्झिट पोल जाहीर व्हायला सुरू होतील.
काय होते मागील तीन निवडणुकांचे अंदाज?
- २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला १९५ तर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला १८५ जागा मिळतील, असा एक्झिट पोल्सचा अंदाज होता. प्रत्यक्षात यूपीएला २६२ आणि एनडीएला १५८ जागा मिळाल्या होत्या.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला २८३ तर यूपीएला १०५ जागा मिळतील, असा एक्झिट पोल्सचा अंदाज होता. प्रत्यक्षात एनडीएला ३३६ तर यूपीएला ६० जागा मिळाल्या होत्या.
- २०१९च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३०६ आणि यूपीएला १२० जागा मिळतील, असा बहुतांश एक्झिट पोल्सचा अंदाज होता. प्रत्यक्षात एनडीएला ३५३ तर यूपीएला फक्त ९३ जागा मिळाल्या होत्या.