मोदींनी प्रधानमंत्रिपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांनी वापरलेली भाषा आत्मविश्वास गमावल्याचेच द्योतकः शरद पवारांचा हल्लाबोल


मुंबईः  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी भाषा वापरली, त्यामुळे मी थक्क आणि आश्चर्यचकीत झालो. धक्कादायक म्हणजे त्यांनी माझा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला आणि शिवसेना (ठाकरे गट) नकली असल्याची टीका केली. प्रधानमंत्र्यांकडून अशा प्रकारची भाषा अपेक्षित नाही. त्यांनी प्रधानमंत्रिपदाची प्रतिष्ठा कमी केली. त्यांनी आत्मविश्वास गमावल्याचेही दिसून आले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते शरद पवार यांनी चढवला.

शरद पवार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. माझ्या मते मोदी हे पहिले प्रधानमंत्री आहेत, ज्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी आत्मविश्वास गमावल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांनी व्यापक प्रचारासाठी महाराष्ट्राची निवड केली. पूर्वी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींसारखे प्रधानमंत्री फक्त एक किंवा दोन निवडणूक प्रचारसभांना संबोधित करायचे, असेही पवार यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

नरेंद्र मोदींचे मत अवास्तव असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी ‘अब की बार, ४०० पार’चा नारा दिला. ते कोणत्या आधारावार ४०० च्या आकड्यावर पोहोचले, हे मला माहीत नाही. पण तो गाठणे फार कठीण आहे. देशभरात एनडीए विरोधात असलेला तीव्र असंतोष पाहता भाजप बहुमताचा आकडा गाठेल की नाही, याबद्दल मला शंका आहे. दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये एनडीएची कामगिरी निराशाजनक असेल. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर अनेक राज्यांतही भाजपसाठी निराशाजनक स्थिती असेल, असे शरद पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी असेल. ते किमान ५० टक्के जागा जिंकतील. मतदानाच्या चार टप्प्यांच्या अखेरीस, मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाडणे इंडिया आघाडीला कठीण नाही, असा मला विश्वास आलेला आहे. इंडिया आघाडीच्या प्रधानमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. काही दशकांपूर्वी मोरारजी देसाई यांची प्रधानमंत्रिपदी निवड झाली तेव्हा खासदारांच्याच बैठकीत याबाबतचा निर्णय झाला होता. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी नवीन सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता, अशी आठवणही शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *