नवी दिल्लीः बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातील बॅलेन्स चेक करण्याची गरज भासते. परंतु तेव्हा नेमका तुम्हाला तुमचा यूएएन क्रमांक म्हणजेच युनिव्हर्सल अकाऊंट नंबरच आठवत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील बॅलेन्स चेक करता येत नाही. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) यूएएन क्रमांकाशिवाय तुमच्या खात्यातील बॅलेन्स चेक करण्याची सुविधा प्रदान केली आहे.
बऱ्याच वेळा अडचणीच्या काळात ऍडजस्टमेंट करून पाहूनही पैश्यांची जमवाजमव करता येत नाही. हक्काचे म्हणून जे काही लोक असतात, तेही अशावेळी कधीकधी हात वर करतात आणि अशा स्थितीत तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील जमा रकमेची आठवण येते. तुमच्या पीएफ खात्यात नेमकी जमा रक्कम किती? हे तपासून बघणे त्यासाठी तुम्हाला आवश्यक वाटते. पण नेमका त्यावेळी तुम्हाला तुमचा यूएएन नंबरच आठवत नाही.
यूएएन हा बारा अंकी नंबर लक्षात ठेवणे तसे कठीणच. अशावेळी तुम्हाला यूएएन क्रमांकाशिवाय तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासून पाहण्यासाठी ही पद्धत खूपच उपयुक्त ठरू शकते. बहुतेक पीएफ खातेधारकांना ही पद्धतच माहीत नाही. तुमच्या खात्यातील पीएफचा बॅलेन्स तपासून पाहण्याची ही पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती अशी-
तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील बॅलेन्स चेक करायचा असेल तर तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. हा एसएमएस पाठवण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- पीएफ खात्याला नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवण्यासाठी मेसेजमध्ये जाऊन रिसिपन्टच्या ठिकाणी 7738299899 हा मोबाईल क्रमांक टाईप करा.
- नंतर इंग्रजीत कॅपिटल लेटरमध्ये पुढीलप्रमाणे टेक्स्ट मेसेज टाइप करा EPFOHO UAN
- हा मेसेज टाइप केल्यानंतर UAN या अक्षरांनंतर स्पेस देऊन तुम्हाला ज्या भाषेत पीएफ खात्यातील शिल्लक रकमेचा मेसेज हवा आहे, त्या भाषेचा कोड टाइप करा. तुम्हाला इंग्रजीत मेसेज हवा असेल तर EPFOHO UAN ENG टाइप करा आणि तुम्हाला हिंदीत मेसेज हवा असल्यास EPFOHO UAN HIN टाइप करा.
- हा मेसेज सेन्ड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रकमेचा तपशील सांगणारा एसएमएस प्राप्त होईल.
- यूएएन नंबरशिवाय तुमच्या पीएफ खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या पीएफ खात्याशी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- तुमचा मोबाईल नंबर तुमच्या पीएफ खात्याशी नोंदणीकृत नसेल तर मात्र तुम्हाला या पद्धतीने पीएफ खात्यातील बॅलेन्स चेक करता येणार नाही.