छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अनुत्तीर्ण अफगाणी विद्यार्थीनीला नियमबाह्य पदवी दिल्याच्या घोटाळ्याचा मुख्यसूत्रधार आणि मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मझहर फारूकी हे ‘शारीरिकदृष्ट्या अनफिट’ असतानाही त्यांची याच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी दुसऱ्या टर्मसाठी नियमबाह्य पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्यांची शारीरिक क्षमता आणि पुनर्नियुक्तींवर २०२१ पासून ५० हून अधिक लेखी आक्षेप नोंदवण्यात येऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नसल्याची धक्कादायक माहिती ‘न्यूजटाऊन’च्या हाती आली आहे.
रोझाबाग येथील मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. मझहर फारूकी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता असताना त्यांनी २०१८-१९ मध्ये खातेमा काकर नूर मोहम्मद या अनुत्तीर्ण अफगाणी विद्यार्थीनीस बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरला बेकायदेशीररित्या प्रवेश दिला आणि विद्यापीठाने प्रवेश रद्द करूनही तिचा सहाव्या सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरून घेऊन तिला परीक्षेला बसण्याची परवानगी देऊन पदवी घोटाळा केला होता.
या घोटाळा प्रकरणी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालात डॉ. फारूकी यांना दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची घोषणा तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जून २०२२ मध्ये केली होती. ती चौकशी अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
अनुत्तीर्ण अफगाणी विद्यार्थीनीला उत्तीर्ण करून तिला पदवी मिळवून दिल्याचा डॉ. फारूकी यांचा घोटाळा चर्चेत असतानाच ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांना मौलाना आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावर सलग दुसऱ्या टर्मसाठी नियमबाह्य पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि या नियमबाह्य पुनर्नियुक्तीला विद्यापीठ प्रशासनाने मान्यताही देऊन टाकली.
या पुनर्नियुक्तीपूर्वी डॉ. मझहर फारूकी हे शारीरिकदृष्ट्या अनफिट असून त्यांची वैद्यकीय मंडळासमोर शारीरिक तपासणी करण्यात यावी, अशी तक्रार ईसा यासीन यांनी २५ जानेवारी २०२१ रोजी संस्थेच्या सचिवांकडे आणि २२ मार्च २०२१ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि विभागीय सहसंचालकांकडे (उच्च शिक्षण) केली होती. या तक्रारीकडे हेतुतः दुर्लक्ष करून डॉ. फारूकी यांच्या पुनर्नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात आली.
नियम काय सांगतो?
विद्यापीठ अनुदान आयोगाने १८ जुलै २०१८ रोजी जारी केलेली अधिसूचना आणि महाराष्ट्र शासनाच्या ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार, जर संस्था प्राचार्यांना पुनर्नियुक्ती देण्यास इच्छूक असेल तर त्या संस्थेने किमान सहा महिने आधी एक्स्टर्नल पीअर रिव्ह्यूची प्रक्रिया सुरू करणे अनिवार्य आहे.
परंतु डॉ. मझहर फारूकी यांना मौलाना आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी दुसऱ्या टर्मसाठी पुनर्नियुक्ती देताना ही प्रक्रियाच धाब्यावर बसवण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासनही या नियमबाह्य प्रक्रियेत सहभागी झाले.
मौलाना आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावर १ सप्टेंबर २०१६ रोजी रुजू झालेले डॉ. मझहर फारूकी यांची पहिली टर्म ३१ ऑगस्ट २०२१ रोजी संपणार होती. मौलाना आझाद शिक्षण संस्थेला त्यांना दुसऱ्या टर्मसाठी नियुक्ती द्यायची होती तर किमान सहा महिने आधी ती प्रक्रिया करणे अनिवार्य होते परंतु संस्थेने तसे न करता डॉ. फारूकी यांना दुसऱ्या टर्मसाठी प्राचार्यपदी नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला २६ ऑगस्ट २०२१ रोजी पाठवला. तेव्हा त्यांच्या पहिल्या टर्मची मुदत संपण्यासाठी अवघे सहाच दिवस शिल्लक राहिलेले होते.
हा प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या दिवशीच म्हणजे २६ ऑगस्ट २०२१ रोजी विद्यापीठाने डॉ. फारूकी यांची प्राचार्यपदी पुनर्नियुक्ती करण्यासाठी कुलगुरू प्रतिनिधी म्हणून कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.जी. विधाते यांची नियुक्ती केल्याचे पत्र दिले.
हे पत्र प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत म्हणजेच २७ ऑगस्ट २०२१ रोजी एक्स्टर्नल पीअर रिव्ह्यू कमिटीची बैठक झाली आणि त्याच दिवशी समितीच्या अहवालासह डॉ. विधाते यांचा स्वतंत्र अहवाल विद्यापीठाला सादर करण्यात आला. नियमानुसार सहा महिने आधी पूर्ण करावयाची ही प्रक्रिया मुदत संपण्याच्या पाच दिवस आधी केवळ दोनच दिवसांत पूर्ण करण्यात आली.
ही प्रक्रिया पूर्ण करताना ना विद्यापीठाने नियमांतील तरतुदी पाहिल्या ना एक्स्टर्नल पीअर रिव्ह्यू समितीवर कुलगुरू प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या डॉ. विधाते यांना या तरतुदी तपासून पाहण्याची गरज वाटली. त्यामुळे १ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. फारूकी हे दुसऱ्या टर्मसाठी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू झाले आणि विद्यापीठाने २१ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांच्या पुनर्नियुक्तीस मान्यताही देऊन टाकली.
विद्यापीठ प्रशानातील नेमका कोणाचा वरदहस्त?
प्राचार्य डॉ. मझहर फारूकी यांना वयोमानानुसार दृष्टिदोष असल्यामुळे आणि कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय ते काम करण्यास अक्षम असल्यामुळे त्यांची वैद्यकीय मंडळामार्फत शारीरिक चाचणी करण्यात यावी तसेच विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्धारित केलेल्या नियमांची पायमल्ली करून त्यांची प्राचार्यपदी झालेली पुनर्नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशा एक नव्हे पन्नासहून अधिक तक्रारी, त्या तक्रारींची स्मरणपत्रे ईसा यासीन यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालकांकडे केल्या. मात्र त्यापैकी एकाही तक्रारीची दखल विद्यापीठ प्रशासन किंवा विभागीय सहसंचालकांनी घेतली नाही. त्यामुळे डॉ. फारूकी यांच्यावर विद्यापीठ प्रशासनातील नेमका कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या तक्रारी बेदखल करण्यात आल्यामुळे शारीरिकदृष्ट्या अनफिट असलेले आणि प्राचार्यपदी नियमबाह्य पुनर्नियुक्ती मिळवलेले डॉ. फारूकी अजूनही कार्यरत आहेत. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून नियमित वेतनही खिशात घालत आहेत. आता नवे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू तरी या तक्रारींवर साठलेली धुळ झटकून कायदेशीर कार्यवाही करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.