मुंबईः महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशा मतदारसंघांपैकी एक असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने कुणबी मराठा समाजाचे अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना चांगलीच झुंद द्यावी लागणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकिट कापून माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) सुटली असून त्यांनी बजरंगबप्पा सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता बीड लोकसभेच्या मैदानात तिसरा उमेदवार उतरला असून वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
१९९५ पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसच्या केशरकाकू क्षीरसागर यांनी तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. परंतु १९९६ पासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे बीड लोकसभा मतदारसंघावर कायमच वर्चस्व पहायला मिळाले आहे. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांचे मताधिक्य घटले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी तब्बल ३७.७० टक्के मते मिळवत त्यांना काट्याची टक्कर दिली होती.
याही वेळी भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) बजरंग सोनवणे अशी दुहेरी रंगतदार लढत होण्याची चिन्हे असतानाच वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून अशोक हिंगे पाटील यांना मैदानात उतरवले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन आणि त्यांच्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर झालेली कारवाई आणि आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हा सर्वात चर्चेला आणि कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. नेमके तेच हेरून वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे पाटील हा कुणबी मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.
भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) बजरंग सोनवणे हे दोघेही प्रबळ उमेदवार मानले जात असतानाच मराठा नेत्यांपैकी मातब्बर नेते अशी ओळख असलेले अशोक हिंगे पाटीलही मैदानात उतरवण्यात आल्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.. वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या पाठीमागे बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि कुणबी मराठा मते उभी राहिली तर या मतदारसंघातील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे.
सातवेळा मराठा खासदार
विशेष म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाचे आतापर्यंत सातवेळा मराठा नेत्याने प्रतिनिधित्व केले आहे. रखमाजी धोडिंबा पाटील (१९५७-६२, काँग्रेस), नाना रामचंद्र पाटील (१९६७-७१, माकप), सयाजीराव त्र्यंबकराव पंडित (१९७१-७७, काँग्रेस), रजनी अशोक पाटील (१९९६-९८, भाजप), जयसिंगराव गायकवाड पाटील (१९९८-९९, १९९९-२००४ भाजप आणि २००४-२००९ राष्ट्रवादी काँग्रेस) हे ते बीडचे खासदार होते. बीड लोकसभा मतदारसंघात कुणबी- मराठा मते निर्णायक आहेत. वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्याकडे ही किती मते वळतात, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.