होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा, पुढचे चार दिवस काळजीचे!


मुंबईः  होळीनंतर महाराष्ट्रात तापमानात वाढ होऊन कडक उन्हाळा जाणवेल. पुढचे चार दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून काळजी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २७ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्याच्या अनेक भागात उन्हाची काहिली जाणवण्याची शक्यता आहे.

राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला असला तरी राज्याच्या उर्वरित भागात तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उकाडा वाढला आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

देशभरात एकीकडे होळी साजरी करण्याची लगबग सुरू असताना महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात उष्णतेत वाढ होत आहे. यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत असून उकाडा वाढला आहे.

 कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरडे हवामान आहे. त्यातच दक्षिण भारताकडून महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहात आहेत. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. येत्या २७ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत उन्हाची काहिली जाणवण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा यंदा मार्च महिन्यातच जाणवू लागल्या आहेत. १९७० पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १९७० ते २०२४ या वर्षांत एकदाही तापमानात घसरण नोंदवली गेली नाही. यंदाच्या मार्च महिन्यातही हीच स्थिती दिसून येत आहे. होळी संपल्यानंतर उन्हाचा कडाका आणखी जाणवेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

पूर्वी मार्च महिन्यात उष्णतेच्या झळा अभावानेच दिसून येत होत्या. सद्यस्थितीत जगभरात होणारी तापमान वाढ, वाढत्या उष्णतेच्या लहरी, सतत वाढत जाणारे तापमान हा घटनाक्रम सातत्याने दिसून येत आहे. यंदाच्या मार्च महिन्यात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात मार्च महिन्यात जास्त उष्णतेचा महिना म्हणून नोंदला जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!