अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस, निवडणूक आयोगाचा निकाल; पक्ष आणि चिन्ह दादांकडेच, शरद पवारांना मोठा धक्का!


नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर खरा पक्ष कोणाचा? शरद पवारांचा की अजित पवारांचा? हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पोहोचला होता. या वादात आता निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे शिक्कामोर्तब करत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात असून या निकालावर तीव्र आक्षेप घेत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार यांच्या नेतृत्वातील एक गट भाजपशी हातमिळवणी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कोणाचे? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता. त्यावर गेली सहा महिने निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. या सुनावणीसाठी स्वतः शरद पवारही हजर रहायचे तर अजित पवार गटाच्या वतीने सुनिल तटकरे आणि अन्य महत्वाचे नेते हजर रहात होते. अखेर सहा महिन्यांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर आज (६ फेब्रुवारी) निवडणूक आयोगाने आपला निकाल जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले आहे.

निवडणूक आयोगात झालेल्या १० सुनावण्यांदरम्यान अजित पवार गट आणि शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी आपल्या बाजूने असल्याचा दावा अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला होता.

निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निकालानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते राज्यभर जल्लोष करत आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल आपण नम्रपणे स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर निवडणूक आयोगाचा हा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

शरद पवार गटाला पर्यायी चिन्हासाठी ७ फेब्रुवारीची मुदत

निवडणूक आयोगाने हा निकाल देतानाच शरद पवार गटाला तीन पर्यायी निवडणूक चिन्हे पाठवण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मालजा जात आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवारांना नवीन पक्ष स्थापनेसाठी विशेष सवलत दिली आहे.

सुप्रीम कोर्टात जाणारः पाटील

निवडणूक आयोगाचा हा निकाल धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जात आहे. देशातील जवळपास सर्वच संवैधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्यामुळे तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करून आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल, याची खात्री असल्याचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

नव्याने पक्ष उभा करूः खा. सुळे

शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता. जे शिवसेनेबरोबर केले, तेच आमच्यासोबत होईल, याची आम्हाला कल्पना होती. शरद पवारांनी अनेकदा शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यांनी ६० व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. आता पुन्हा आम्ही पक्ष उभा करू. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांचाच आहे, हे पूर्ण देशाला माहिती आहे. पण काही अदृश्य शक्तींनी आमच्याकडून पक्ष काढून घेतला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांना पुन्हा पक्षात घेतले ही मोठी चूकः आव्हाड

पक्ष आणि चिन्ह आमच्या हातातून जाणारच होते. यात नवे काय? अजित पवारांनी २०१९ मध्ये जे केले, त्यानंतर त्यांना पक्षात घेणे आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री करणे ही आमची सर्वात मोठी चूक होती. घर का भेदी लंका ढहाए असे म्हटले जाते. त्याच भूमिकेत आता अजित पवार आहेत. आज शरद पवारांची राजकीय गळचेपी केली गेली. या सगळ्यामागे एकच माणूस आहे, अजित पवार, असे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आम्ही पक्ष पळवला म्हणणे अयोग्यः अजितदादा

पक्षसंघटनेतील बहुसंख्य सदस्य माझ्या बाजूने आहेत. हेच लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आजचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो. या निर्णयाचा आनंददेखील आहे. निवडणूक आयोगाने आमची बाजू खरी मानली. बहुसंख्य लोक ज्यांच्या बाजूने तेच लोक पक्ष चालवतात. त्यामुळे आम्ही पक्ष पळवला हे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यांनी कुठल्याही जिल्ह्यात माझ्यासोबत यावे. मग त्यांना वास्तव परिस्थिती कळेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!