ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजाअर्चा करण्याची परवानगी, वाराणसी न्यायालयाचा निर्णय


लखनऊः ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्याची परवानगी हिंदू भाविकांना देण्यात आली. वाराणसी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. हिंदू भाविक ज्ञानवापी मशिदीच्या ‘व्यास का तेखाना’ म्हणजेच व्यासाचे तळघरमध्ये पूजा-अर्चा करू शकतात, अशी परवानगी न्यायालयाने दिली असून जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवसांत हिंदूंना त्याठिकाणी पूजाअर्चा करण्याची व्यवस्था करून द्यावी, असे निर्देशही वाराणसी न्यायालयाने दिले आहेत. सध्या ज्ञानवापी मशिदीतील व्यास का तेखाना हा भाग बंद ठेवला गेलेला आहे.

वाराणसी जिल्हा प्रशासनाने २४ जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील दक्षिणेकडे असलेल्या तळघराचा ताबा घेतला होता. आचार्य वेद व्यासपीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र कुमार पाठक यांनी यासंबंधीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या दक्षिणेकडील तळघराचा ताबा वाराणसीच्या जिल्हादंडाधिकाऱ्याकडे दिला होता.

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबांकडून १९९३ पर्यंत पूजाअर्चा करण्यात येत होती. १९९३ पासून ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात पूजाअर्चा बंद करण्यात आली होती, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, व्यासाचे तळघर येथे हिंदूंना पूजाअर्चा करण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने सात दिवसांच्या आत तेथे व्यवस्था करून द्यावी, जेणे करून तेथे प्रत्येकाला पूजाअर्चा करण्याची संधी मिळेल, असे जैन म्हणाले.

१ फेब्रुवारी १९९८६ रोजी न्यायमूर्ती के.एम. पांडे यांनी बाबरी मशिदीचे टाळे उघडण्याचा निर्णय दिला होता. आजच्या निर्णयाची तुलना आम्ही न्यायमूर्ती पांडे यांच्या निर्णयाशी करत आहोत. वाराणसी न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक आहे. आता यापुढे वजूखान्याचे सर्वेक्षण करणे हे आमचे लक्ष्य असेल, असेही जैन म्हणाले. दरम्यान, मुस्लिम पक्षकारांकडून वाराणसी न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी सुरू आहे.

काय आहे वाद?

वाराणसीमध्ये असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला ज्ञानवापी मशीद आहे. याच ज्ञानवापी मशीद परिसरात आगोदर हिंदूचे मंदिर होते, असा दावा केला जातो. तर मुस्लिम पक्षकारांकडून हा दावा फेटाळण्यात येतो. २०२२ मध्ये पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात बाहेरच्या भिंतीला लागून असलेल्या माँ शीनगर गौरीची पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी या महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासूनच हे प्रकरण चर्चेत आहे. सध्या याबाबतचा वाद न्यायालयात सुरू आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!