कुलगुरूंनी नेमली नवी टीमः डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्र-कुलगुरूपदी तर डॉ. खापर्डे, शिरसाठ, हुंबे, साळुंके यांची अधिष्ठातापदी वर्णी!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी नवीन टीम नियुक्त केली असून माजी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्र-कुलगुरुंसोबतच चार अधिष्ठात्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपला. त्यांच्यासोबतच प्र-कुलगुरू आणि चार अधिष्ठातांचाही कार्यकाळ संपुष्टात आला होता. येवलेंचा कार्यकाळ संपल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. परंतु प्र-कुलगुरू आणि चार अधिष्ठात्यांची पदे मात्र गेल्या महिनाभरापासून रिक्तच होती.

डॉ. विजय फुलारी यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज एक प्र-कुलगुरू आणि चार अधिष्ठात्यांच्या तात्पुरत्या नेमणुका केल्या आहेत. त्यात  वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. फुलारी यांनी चार अधिष्ठात्यांच्याही तात्पुरत्या नेमणुका केल्या आहेत. त्यात विज्ञान विद्या शाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. एम.डी. शिरसाठ, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. वैशाली खापर्डे,  मानव्य विद्या शाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. संजय सांळुके तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. वीणा हुंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियमित प्र-कुलगुरुपदी नियुक्तीसाठी कुलगुरू डॉ. फुलारी यांच्याकडून कुलपती तथा राज्यपालांकडे नावे पाठवली जातील. त्यांच्या मान्यतेने नियमित प्र-कुलगुरूंची नियुक्ती केली जाईल. तोपर्यंत डॉ. सरवदे हे प्र-कुलगुरुपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. तर अधिष्ठात्यांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देऊन अर्ज मागवले जातील आणि मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या जातील, तोपर्यंत हे चार अधिष्ठाता कार्यभार सांभाळतील.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!