मुंबईः मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील भाषणात विस्मरण आणि विसंगती होती. ‘जास्त घेतल्या’मुळे त्यांना विस्मरणाचा त्रास झाला असेल. त्यांच्या भाषणात विसरण्याचा भाग जास्त आला. हा ‘जास्त घेतल्या’चा परिणाम आहे, अशा शब्दांत ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये इशारा सभा झाली. या सभेत त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत खालच्या भाषेत टीका केली. आरक्षण मिळू दे, तुला कचकाच दाखवतो, अशी जाहीर धमकीच जरांगे यांनी भुजबळांना दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या टिकेला भुजबळ यांनी मुंबईत पत्रकारांनी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
तुला बघतो… तुला बघतो असे ते सारखे बोलत होते. छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही. भुजबळ आयुष्यभर दादागिरीच्या विरोधात लढत आला आहे. तुमच्या जन्माच्या आगोदरपासून भुजबळ लढत आहे, असे भुजबळ म्हणाले.
जरांगेच्या आजच्या भाषणात विसंगती जास्त होती. ‘जास्त घेतल्या’मुळे त्यांच्या भाषणात विस्मरणाचा भाग जास्त आला. मनोज जरांगेंच्या स्मरणशक्तीमध्ये गडबड आहे. हा जास्त घेतल्याचा परिणाम आहे. ते एकाच भाषणात विसंग बोलतात. जरांगे हे हॉटेल वगैरे भुजबळांनी जाळल्याचा आरोप कतात. मराठ्यांना डाग लागल्याचे म्हणतात. यापूर्वी ते बीडच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जाळल्याचे म्हणाले होते. आजच्याच सभेत मराठ्यांच्या वाट्याला जर गेला तर बीडला काय होते, हे लक्षात ठेवा, असेही म्हणतात. म्हणजे बीडला जे झाले ते तुम्हीच केले, हे सिद्ध होते ना? तुम्हीच कबुल केले आहे. त्यामुळे त्यांनी थोडे अनुलोम, विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी म्हणजे त्यांच्या भाषणात विसंगती येणार नाही, असा चिमटा भुजबळांनी काढला.
त्यांचे अर्धे भाषण फक्त भुजबळांवरच होते. नंतरच भाषण लेकरं वगैरे वगैरेवर होते. भुजबळावर बोलले नाही, टीका केली नाही तर भाषणात काय बोलणार? आणि त्यांची सभा कोण ऐकणार? मी कालच म्हटलं ही व्याह्यांना आरक्षण द्या. व्याह्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या. पण तो मुद्दा आज त्यांनी घेतला नाही. काय झाले माहीत नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत गडबड आहे. एकाच भाषणात दुहेरी बोलतात, असे भुजबळ म्हणाले.
आता २० जानेवारीपर्यंत ते शांत बसणार आहेत. ते एक तर हॉस्पिटलमध्ये तरी राहतात किंवा बाहेर तरी. त्यांची १२ इंची छाती आहे. ठोकून ठोकून उगाच जास्तीचे काही होईल. छातीत गडबड होईल. तब्येत सांभाळा कोणी आरे म्हटले तर कोणीतरी कारे करणारच आहे. सारखं सारखं बोलत राहिलात तर मला बोलावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पीटीशन दाखल करून घेतली आहे, हे दिलासादायक आहे. आम्ही मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या बाजूने आहोत. वेगळे आरक्षण मराठा मिळेल, त्याला आमचा कधीच विरोध नव्हता, असेही भुजबळ म्हणाले.