पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंकडून परीक्षा विभागातही ‘चारसौ बीसी’, दोन गुणाचे वाढवून केले २० गुण!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  बोगस अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू मारोती कऱ्हाळे यांनी परीक्षा विभागतही ‘चारसौ बीसी’ केल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे. कऱ्हाळे यांनी अधिकाराचा दुरूपयोग करून एका परीक्षार्थ्याला परीक्षेत शून्य गुण मिळालेले असताना ते वाढवून चक्क २० गुण केल्याची माहिती हाती आली आहे.

पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे यांनी बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर करून २००३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २००३ मध्ये अधीक्षकपदावर नोकरी मिळवली. बोगस अनुभव प्रमाणपत्रावर विद्यापीठात नोकरी आणि त्याच आधारे उपकुलसचिवपदी पदोन्नती मिळवलेल्या कऱ्हाळे यांनी परीक्षा विभागातही गंभीर स्वरुपाच्या अनियमितता केल्या आहेत.

विष्णू कऱ्हाळे यांनी परीक्षा विभागात केलेला गुणवाढ घोटाळा ऑक्टोबर २०१५ च्या परीक्षेचा आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये एम.एससी. रसायनशास्त्राच्या तृतीय सत्राच्या परीक्षेत देवगिरी महाविद्यालयातील बैठक क्रमांक आरसी ०३०१०५५ या परीक्षार्थ्याला ऍप्लिकेशन ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी (Application of Spectroscopy (पेपर क्रमांक Chem 301) या पेपरमध्ये केवळ दोन गुण मिळाले होते.

या प्रकरणात कोणतीही विहित प्रक्रिया न करता किंवा परीक्षकाकडून उत्तरपत्रिकेची पुनर्तपासणी केलेली नसतानाही विष्णू कऱ्हाळे यांनी स्वतःला अधिकार नसतानाही परीक्षा विभागाच्या अभिलेखात खाडाखोड करून या परीक्षार्थ्याचे तब्बल १८ गुण वाढवून दोन गुणाचे चक्क २० गुण केले. याबाबतची लेखी तक्रार विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे ११ एप्रिल २०१८ रोजीच करण्यात आली आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाने विष्णू कऱ्हाळेंच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या गुणवाढ घोटाळ्यात विद्यापीठ प्रशासनातील अन्य अधिकारीही सामील आहेत की काय? अशी शंका घ्यायला वाव आहे.

परीक्षेच्या अन्य कामातही गंभीर अनियमितता

कोणत्याही महाविद्यालयाची प्रवेश क्षमता आणि तुकड्या निर्धारित करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. परंतु अनेक महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवेश दिले. या महाविद्यालयांनी विष्णू कऱ्हाळे यांच्याशी संगनमत करून अतिरिक्त प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे विद्यापीठात सादर केली आणि विष्णू कऱ्हाळे यांनी ही परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारून या अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घेतल्या आहेत.

अशा धोरणात्मक बाबींसाठी कुलगुरूंची मान्यता घेणे बंधनकारक असताना तशी कोणतीही मान्यता न घेताच विष्णू कऱ्हाळे यांनी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करून अतिरिक्त प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नियमबाह्य परीक्षा घेतल्या. याबाबतचीही तक्रार २०१८ मध्येच विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली, परंतु कऱ्हाळेंविरुद्ध कोणतीही कारवाई झालीच नाही.

‘टोकन’ असेल तरच होणार काम!

महामार्गावर परराज्यातून येणाऱ्या ट्रक्सना वाहतूक पोलिसांकडून ‘टोकन’ दिले जाते. हे टोकन दाखवल्याशिवाय त्या ट्रकचा पुढचा मार्ग सुकर होत नाही, अशा अनेक कथा सांगितल्या जातात. विष्णू कऱ्हाळे यांनी शैक्षणिक विभागात उपकुलसचिव म्हणून कार्यरत असताना याच ‘टोकन’ पद्धतीचा अवलंब केला.

महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचे पत्र, अध्यापक मान्यता, प्राचार्य मान्यता, जाहिरातीची मान्यता, नवीन महाविद्यालयाचे संलग्नीकरण, नवीन महाविद्यालयाच्या शिफारशीचे पत्र, कॅस अंतर्गत अध्यापक मान्यता इत्यादी बाबतीत विष्णू कऱ्हाळे जोपर्यंत विभागातील कर्मचाऱ्यांना ‘टोकन’ देत नव्हते, तोपर्यंत विभागातील कर्मचारी कोणतेही पत्र जारी करत नव्हते. विष्णू कऱ्हाळे यांनी दलाल नेमून त्यांच्यामार्फत वसुली केल्याचा आरोप करत कुलसचिवांकडे लेखी तक्रार झाली. चौकशी करून कऱ्हाळेंच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली, परंतु कऱ्हाळेंच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.

किती उपकुलसचिवांच्या नियुक्त्या बोगस?

पीएचडी विभागात कार्यरत असलेल्या विष्णू कऱ्हाळेंसह विद्यापीठाच्या अन्य विभागात कार्यरत असलेल्या उपकुलसचिवांपैकी काही उपकुलसचिवांच्या नियुक्त्यांमध्ये कऱ्हाळेंसारखाच घोळ आहे. काहींनी कऱ्हाळेंप्रमाणेच बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली तर काहींनी निवड समितीच्याच अहवालात खाडाखोड करून विद्यापीठात बस्तान बसवले असल्याची माहिती न्यूजटाऊनकडे आहे. आता या संपूर्ण नियुक्त्यांचीच उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!