पिस्तुलातून गोळ्या झाडणाऱ्या चार गुंडांना एकट्या महिलेने झाडूनेच पिटाळले, चित्रपटातील दृश्यालाही लाजवेल असा पहा व्हिडीओ!


भिवानीः चार गुंड अंदाधुंद गोळ्या चालवत होते… एका हत्याप्रकरणातील आरोपी असलेल्या गँगस्टरची हत्या करण्याच्या इराद्याने ते आले होते. गँगस्टरची हत्या करण्यासाठी आलेले गुंडही काही कमी नव्हते. मोटारसायकलवरून आलेले हे चार गुंड गँगस्टरवर अचानक अंदाधुंद गोळ्या चालवत होते… तेवढ्यात एक एकटी महिला त्यांच्याशी भिडते… या महिलेच्या हातात केवळ एक झाडू होता… हातात झाडू घेतलेली ही महिला पिस्तुलातून अंदाधुंद गोळ्या झाडणाऱ्या चारही गुंडांना पिटाळून लावते!

ही काही लहान मुलांना सांगण्यासाठी कथा किंवा किस्सा नाही किंवा एखाद्या चित्रपटातील दृश्यही नाही. ही एक वास्तविक घटना आहे. परंतु कोणत्याही चित्रपटातील एखाद्या दृश्यापेक्षा ती तसूभरही कमी नाही. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

घटना हरियाणातील भिवानी येथील आहे. डाबर कॉलनीतील एका गल्लीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सोमवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक व्यक्ती एका घराबाहेर उभी आहे. तेवढ्यात दोन मोटारसायकलींवरून चार गुंड येतात आणि त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरूवात करतात, असे या व्हिडीओत दिसत आहे.

मोटारसायकलवरून आलेले चार गुंड ज्या व्यक्तीवर गोळ्या झाडतात, त्या व्यक्तीचे नाव हरिकिशन असल्याचे समोर आले आहे. हरिकिशन रवि बॉक्सर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हरिकिशनचा संबंध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी आहे. हरिकिशन सध्या जामिनावर बाहेर आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी भिवानी पोलिसांनी हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून हरिकिशनसह पाच जणांना अटक केली होती.

सोशल मीडियावर जे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, त्यात दिसत आहे की, हरिकिशन आपल्या घराच्या गेटच्या बाजूला उभा आहे. तेव्हा दोन मोटारसायकल येऊन त्याच्या जवळ थांबतात. मागे बसलेले लोक उतरतात आणि अचानक पिस्तुलातून गोळ्या झाडायला सुरूवात करतात. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घाबरलेला हरिकिशन गेटकडे पळू लागतो. गोळ्या लागून जखमी झाल्यामुळे गेटच्या बाहेरच पडतो परंतु कसाबसा आत जाऊन गेट बंद करून घेतो. गोळीबार करणारे गुंड गेट उघडण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हा सीसीटीव्ही फ्रेममध्ये एक महिला दिसते.

व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेच्या हातात केवळ नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेला एक झाडू आहे. तरीही ती गोळ्या चालवणाऱ्या गुंडांवर तुटून पडते. महिलेचा हा रुद्रावतार पाहून गोळ्या चालवणारे गुंड दचकतात आणि पळू लागतात. ही महिला हातात झाडू घेऊनच त्यांचा पाठलाग करताना दिसते आहे. हे गुंड त्या महिलेवरही गोळी झाडतात. परंतु निशाणा चुकल्याने गोळी महिलेला लागत नाही.

या चार गुंडांच्या गोळीबारत जखमी झालेला गँगस्टर हरिकिशनला रोहतक येथील पीजीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे भिवानी पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजची झाडाझडती घेत असून गोळीबार करणारे गुंड आणि त्यांच्यासोबत आलेल्या दोन मोटारसायकलस्वारांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहा व्हीडिओ

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *