मुंबईकरांचा श्वास होणार मोकळा! रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर, रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके!


मुंबई:  मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यासाठी एक हजार टॅंकर लावावेत. त्यासाठी विशेष पथके नियुक्त करावीत. एमएमआरडीएची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावीत. ॲण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्तांना सांगितले.

वर्षा निवासस्थानी गुरूवारी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य संवादप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धुळमुक्तीसाठी पाण्याची फवारणी

मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत. त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या एक हजारपर्यंत वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईसह महानगर परिसरात एमएमआरडीएमार्फत विकास कामे सुरू आहेत अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले.

माती, डेब्रीज वाहून नेताना झाकणे अनिवार्य

सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर संनियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

अर्बन फॉरेस्ट वाढवणार

राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढवण्यासाठी महानगरपालिकांनी पुढाकार घ्यावा. मेडन मध्ये वृक्षारोपण करावे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा साप्ताहिक आढावा

राज्यातील प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयआयटीच्या तज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी या तज्ञांनी केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!