ही दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक की मंत्र्यांचे पर्यटन?, संभाजीनगरातील ‘फाईव्ह स्टार’ थाटावरून वडेट्टीवारांचा सवाल


मुंबईः मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असून संपूर्ण मंत्रिमंडळ या बैठकीसाठी मराठवाड्यात दाखल होत आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा थाट मात्र फाईव्ह स्टार असून या फाईव्ह स्टार बैठकीवर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मंत्रिमंडळाची ही बैठक दुष्काळग्रस्त भागासाठी होत आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा असा खोचक सल्ला दिला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) राज्य मंत्रिमंडळाची शनिवारी तीन तास बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, उपसचिवांच्या निवासाची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलात करण्यात आली आहे. त्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.

‘राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव्ह स्टार हॉटेल जेवायला १५०० रुपयांची थाळी… दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?’ असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे केला आहे. वडेट्टीवार यांनी या ट्विटमध्ये कोणाच्या निवासाची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे, याची यादीच जाहीर केली आहे.

‘सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. १६ तारखेला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का, असा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकीचे व्यवस्थापन करणारे हे पहिले सरकार आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. मागच्या ऑगस्ट महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात सरासरी शंभर-सव्वाशे शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी त्रस्त आहे. ९६ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असताना फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट बैठक घेण्याची गरज का पडली? हा खरा प्रश्न आहे,’ असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

मौजमस्तीसाठी तर सरकार येत नाही ना?

‘कॅबिनेट बैठकीच्या नावाखाली हे सरकार मौजमस्ती करायला तर येत नाही ना? असा विषय चर्चेला आला आहे. यापूर्वी मराठवाड्यात कॅबिनेटच्या अनेक बैठका झाल्या. पण मंत्री कधीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले नव्हते. त्यांनी फाईव्ह स्टारचा पाहुणचार घेतला नव्हता. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण किंवा यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या तेव्हा ते गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते,’ अशी आठवणही वडेट्टीवार यांनी दिली आहे.

५० हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले?

‘फडणवीस सरकारने २०१६ मध्ये जाहीर केलेले पॅकेज मराठवाड्यातील जनता विसरलेली नाही. ५० हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले? मराठवाड्यातील जनता अशा नालायक सरकारला माफ करणार नाही. बैठकीसाठी येत असलेल्या मंत्र्यांचा पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. सरकारला जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटत असेल तर त्यांनी जरा तरी विचार करावा’, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

मंत्र्यांच्या फाईव्ह स्टार खर्चाची यादी

वडेट्टीवार यांनी या ट्विटमध्ये छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी होत असलेल्या मंत्र्यांच्या फाईव्ह स्टार खर्चाची यादीच दिली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्यासाठी सरकारकडून लाखो रुपये खर्ची घातले जात आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता केटरर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले असून एका थाळीची किंमत एक हजार ते दीड हजार रुपये असणार आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगरातील कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील किती रूम बुक करण्यात आल्या, त्याचा तपशीलच जाहीर केला आहे. तो असा-

-फाईव स्टार हॉटेल ३० रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)

-ताज हॉटेल ४० रूम बुक (सर्व सचिव)

-अमरप्रीत हॉटेल ७० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)

-अजंता अॅम्बेसेडर ४० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)

-महसूल प्रबोधिनी १०० रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)

-पाटीदार भवन १०० (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)

-वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे- २० (इतर अधिकारी)

-एकूण १५० गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.

-औरंगाबाद शहरातील देखील १५० गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.

-मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!