आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार एसटी बसचे आरक्षण!


मुंबई: एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.

यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे.

रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटदेखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे.

प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या करारप्रसंगी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया, आयआरसीटीसीच्या व्यवस्थापकीय संचालक सीमाकुमार आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *