मराठा आरक्षणः यवतमाळ बंदला हिंसक वळण, दुकानांवर दगडफेक; चौकाचौकात टायर जाळून जालन्यातील लाठीमाराचा निषेध


यवतमाळः जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आज मंगळवारी मराठा-कुणबी मोर्चाने यवतमाळ बंद पुकारला असून या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एका दुकानावर दगडफेकही केली. चौकाचौकात टायर जाळून आंदोलक जालन्यातील अमानुष लाठीमाराचा निषेध करत आहेत.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. या घटनेस राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप करत राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ मराठा-कुणबी मोर्चाने आज मंगळवारी यवतमाळ बंदची हाक दिली आहे.

आज सकाळी दहा वाजेनंतर या बंदची तीव्रता वाढली. आंदोलकांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यादरम्यान, पोस्टल ग्राऊंड परिसरातील हल्दीरामच्या दुकारानावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दुकानाच्या दर्शनी भागाच्या काचा फुटल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

यवतमाळमध्ये आंदोलक चौकाचौकात टायर जाळून जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा निषेध करत आहेत. नागपूर-तुळजापूर महामार्गावर वनवासी मारोती चौकात आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन करत टायर जाळले. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचा पाचारण करण्यात आले होते.

यवतमाळ बंदमुळे शहरात येणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गांवरील बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. बंदच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!