छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): भ्रष्टाचार, प्राध्यापकांशी गैरवर्तन आणि कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचा आरोप असलेल्या औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील (उच्च शिक्षण) प्रशासन अधिकारी वनिता उदयराव उर्फ व्ही. यू. सांजेकर यांच्याविरुद्ध आठ दिवसांत कारवाईचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले असून पंधरवडा उलटत आला तरी सांजेकरांविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शिक्षण संचालकांनी आंदोलनकर्त्या प्राध्यापकांना उल्लू बनवले की काय? असा सवाल प्राध्यापकांकडून विचारला जात आहे.
औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी व्ही. यू. सांजेकर यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल विविध प्राध्यापक संघटना आणि संस्थाचालकांनी सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालकांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीही त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे औरंगाबाद विभागातील विविध प्राध्यापक संघटनांनी २५ जुलै रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.
प्राध्यापकांच्या या धरणे आंदोलनात बामुक्टो, बामुक्टा, स्वाभिमानी मुप्टा, परिवर्तन ग्रुप, जोशाबा, भारतीय पिछडा शोषित संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी आंदोलनकर्त्या प्राध्यापकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रशासन अधिकारी सांजेकरांविरुद्ध एक आठवड्यात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन सहसंचालकांमार्फत दिले होते. त्यामुळे प्राध्यापकांचे धरणे आंदोलन स्थगीत करण्यात आले होते.
उच्च शिक्षण संचालकांनी सांजेकरांविरुद्ध कारवाईचे आश्वासन देऊन आज तब्बल चौदा दिवस उलटत आले तरी त्यांच्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे उच्च शिक्षण संचालकांकडून सांजेकरांना पाठिशी घातले जात आहे की काय? अशी शंका प्राध्यापक संघटना घेऊ लागल्या आहेत. यासंदर्भात न्यूजटाऊनने औरंगाबादचे विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. सुरेंद्र ठाकूर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
ऑगस्ट क्रांतिदिनी पुन्हा आंदोलन
उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी आश्वासन देऊनही प्रशासन अधिकारी सांजेकरांविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे प्राध्यापक संघटना संतप्त झाल्या असून ऑगस्ट क्रांतिदिनी म्हणजेच येत्या ९ ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रशासन अधिकारी सांजेकर या प्राध्यापकांना धमकावतात, उद्धट व अपमानास्पद बोलतात, कामासाठी पैशाची मागणी करतात, वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करतात आणि वरिष्ठांच्या अधिकारात हस्तक्षेप करतात आणि पदाचा गैरवापर करतात अशी तक्रारही प्राध्यापक संघटनांनी २४ मे २०२३ रोजी उच्च शिक्षण संचालकांकडे केली होती. सांजेकर यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, ही प्राध्यापक संघटनांची मुख्य मागणी आहे.