छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उस्मानाबाद येथील उपपरिसरातील सर्व पदव्युत्तर विभागात प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.
विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन टप्प्यात ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. प्रवेशित विद्यार्थ्यांची जागेवरच सर्व प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यात आली. प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा, आदींसह प्रवेश समितीच्या २२ सदस्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
विद्यापीठाने यापूर्वी घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार निर्धारित कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऐच्छिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता यावा म्हणून १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
मंगळवारपासून ‘स्पॉट अॅडमिशन’
पहिल्या तीन टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविद्या, आंतरविद्या, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेतील तसेच व्यायवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन प्रवेश फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. आता मंगळवार दि. ०१ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना स्पॉट अॅडमिशन दिले जाणार आहेत.
तिन्ही फेऱ्या झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते ३१ जुलै या दरम्यान स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. रिक्त जागांवर ‘फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस’वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत.