पावसाचा धुमाकुळः नांदेड जिल्ह्यात सलग तीन दिवस मुसळधार, मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला; पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट


नांदेड/मुंबईः  मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा असतानाच नांदेड जिल्ह्यात मात्र सलग तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे किनवट आणि माहूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पैनगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्यामुळे मराठवाडा- विदर्भाचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे किनवट तालुक्यातील आकर्षणाचे केंद्र असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.

शुक्रवारी रात्रीपासून किनवट, माहूर आणि हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. पैनगंगा नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे पिके खरडून जाऊ लागली आहेत.

 या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. धानोडा पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे माहूर ते यवतमाळ वाहतूक ठप्प झाली आहे. माहूरच्या सखल भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. माहूरमधील पूर परिस्थिती लक्षात घेता नांदेडहून एसडीआरएफची तुकडी माहूरला रवाना करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत किनवट तालुक्यात १५० मिलीमीटर तर माहूर तालुक्यात १८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात शनिवारीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस असे चित्र आहे. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये बचावकार्य सुरू

यवतमाळ जिल्ह्यातील पूस नदीला पूर आला आहे. महागावमध्ये मुसळधार पावासमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. महागावच्या आनंदनगरमध्ये ८० जण अडकून पडले आहेत. एसडीआरएफची तुकडी महागावमध्ये दाखल झाली असून हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातही पावसाचा कहर सुरूच असून खोराडी नदीला पूर आल्यामुळे बेलोरा गावात पुराचे पाणी शिरले आहे.

पुणे-ठाण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांना २४ तासांचा रेड अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढच्या २४ तासांसाठी पालघर, ठाणे, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांना घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

११ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

एकीकडे मुसळधार पावसाचा कहर सुरूच असताना हवामान विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया  हे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे असून या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!