मुंबईः अजित पवार यांनी काकांविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यामुळे झालेल्या राजकीय भूकंपामुळे बसलेले हादरे अजून शांत व्हायचे असतानाच महाराष्ट्रात आणखी एका राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचेही सांगितले जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नवी दिल्लीत दोनवेळा गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरू असलले राजकीय घमासान आणखी वाढण्याचे संकेत आहेत. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आता पुढचा नंबर थेट सत्ताधारी भाजपचा असू शकतो, यांचे संकेतच पंकजा मुंडे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे मिळत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांनी दोनवेळा दिल्ली दौरा केला. या दोनवेळच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतली. सांगलीतील एका बड्या नेत्याने काँग्रेस नेतृत्वापुढे पंकजा मुंडे यांच्यासाठी जोरदार लॉबिंग केल्याचे सांगितले जाते. न्यूज १८ लोकमतनेे हे वृत्त दिले आहे.
पंकजा मुंडे- सोनिया गांधी यांच्यातील गुप्त भेटीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नसला तरी पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास तयार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांची काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा झाली असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आम्ही पंकजांचे स्वागतच करू, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. ही चर्चा होत असतानाच पंकजा मुंडे यांनी या चर्चेला दुजोराही दिला नाही किंवा त्याचे खंडनही केलेले नाही. त्यामुळे या चर्चेने आणखी जोर धरला आहे.
२०१४ मध्ये राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून पंकजा मुंडे यांचे भाजपमधील राजकीय महत्वा हळूहळू कमी व्हायला सुरूवात झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील दावेदार असलेल्या पंकजा मुंडे यांचे पंख पद्धतशीरपणे छाटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायमच होत असते.
महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना परळी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करणारे त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे या सरकारमध्ये मंत्री बनले आहेत.
त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजप पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी देते की नाही, याबाबत साशंकताच आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आगामी राजकारणाचा वेध घेऊन चाचपणी करण्यास सुरूवात केल्याचे त्यांनी घेतलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्य भेटीवरून स्पष्ट होऊ लागले आहे.
भाजपचे दिवंगत नेत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार असलेल्या पंकजा मुंडे या राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांपैकी एक आहेत. मराठवाड्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रभाव आहे. तरीही भाजपने त्यांना गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात फारसे महत्व दिलेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आणि भाजपमध्ये आपल्यासाठी राजकीय अनिश्चितता आहे, याची पक्की जाणीव झालेल्या पंकजा मुंडे काँग्रेसची वाट धरणार का? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. तसे झाले तर तो सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का असेल.
आज १२.३० वाजता मांडणार भूमिका
दरम्यान, पंकजा मुंडे या आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्या या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडण्याची अपेक्षा आहे. पंकजा मुंडे आता नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.