आम्ही सह्या केल्या पण वेगळी भूमिका कायम, अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांचा शरद पवारांना फोन; बंड पुन्हा फसणार?


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी ३० आमदारांना सोबत घेऊन अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर काही तासांतच अजितदादांसोबत गेलेल्यांपैकी काही आमदारांनी ‘आम्ही सह्या केल्या पण आमची वेगळी भूमिका कायम आहे’, असे फोन करून सांगितल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवारांचे बंड पुन्हा एकदा फसणार की काय? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. उद्या सोमवारपासून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन मैदानात उतरणार असल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले आहे.

  अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी एक ट्विट करून सविस्तर भूमिका मांडली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे, असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांनी ट्विट करून मांडलेली भूमिका जशीच्या तशी त्यांच्याच शब्दांत….

‘देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होते. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे.’

पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल…

‘आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधिमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल.’

आजचा प्रकार मला नवीन नाही!

‘पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहिला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरिक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहित पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील.’

अशी राहील आगामी नीती…

‘माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत. आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील’, असेही शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!