ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्ष मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय


मुंबईः ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. तर मुंबई ट्रान्सहर्बर लिंकला (एमटीएचएल) अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हाशेवा अटल सेतू यांचे नाव देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेची रक्कम १ हजार रुपयांवरून १५०० रुपये करण्याचा आणि दारिद्र्यरेषेवरील पालकांना मुलांनाही शालेय गणवेश मोफत देण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यातील १२ लाख विद्यार्थ्यांना या मोफत गणवेश योजनेचा लाभ होईल.

 जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३ हजार ५५२ कोटी रुपयांच्या खर्चास  मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले या रेल्वे मार्गाचे काम गती घेण्याची शक्यता आहे.

मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल, वरूड आणि फलटण येथे नवीन न्यायालयाने उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

 राज्यात ७०० ठिकाणी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी २१० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!